चिपळूण : शिवजयंतीसह छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे अहमदनगरचे भाजपचे बडतर्फ उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्याविरोधात चिपळूणमध्ये शिवसेनेने प्रखर निषेध नोंदविला. यावेळी शिवसैनिकांनी छिंदम यांच्या पुतळ्याचे दहन करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
छिंदम यांनी शिवजयंतीसह छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याबद्दल पोलिसांनी त्यांना अटक केले होते. दरम्यान, छिंदम यांनी केलेल्या वक्तव्याचा चिपळूण शहर शिवसेनेने तीव्र निषेध केला असून, शिवसैनिकांनी शहरातील शिवाजी चौक येथे छिंदम यांच्या पुतळ्याला चप्पल मारत पुतळ्याचे दहन केले.
यावेळी सेनेचे शहरप्रमुख राजू देवळेकर, तालुकाप्रमुख प्रताप शिंदे, विधानसभा क्षेत्राध्यक्ष बाळा कदम, नगरसेवक शशिकांत मोदी, नगरसेविका सुषमा कासेकर, महिला आघाडी शहरप्रमुख रश्मी गोखले, स्वाती दांडेकर, विभागप्रमुख प्रिया शिंदे, संजय रेडीज, बापू चिपळूणकर, संजय गोताड, बंड्या कासेकर, राजू विखारे, संतोष मिरगल, संतोष पवार, महेश कांबळी, अरुण कांबळी, राणी महाडिक, उमेश पवार, मनोज जाधव उपस्थित होते.