चिपळूण : शहरातील एक उमदा हॉटेलचालक, फेसबुकवरील लिखाणामुळे हजारो लोकांच्या संपर्कात आलेला, साखरपुडा झालेला तरुण डेंग्यूसदृश तापामुळे मृत्यूमुखी पडला आहे. महापुरानंतर शहरात ताप व सर्दीचे रुग्ण सापडत असून, काही खासगी रुग्णालयामध्येही संशयित रुग्ण उपचार घेत आहेत. आदित्य शेखर कुलकर्णी (२९) असे या तरुणाचे नाव. त्याच्या पश्चात आई, वडील आहेत.
शहरातील जुना कालभैरव मंदिराजवळ राहणाऱ्या आदित्यचा मृत्यू अनेकांना चटका लावून गेला आहे. त्याचे चायनीज पदार्थांचे हॉटेल होते. आधी कोरोनाने हॉटेल व्यवसाय ठप्प होता. त्यातून सावरत असताना महापुराने सर्वस्व लुटले. महापुरानंतर २१ दिवसांच्या परिश्रमांनंतर त्याने हॉटेल नव्याने सुरू केले होते. पाच हजार लोकांना पुरतील इतकी भांडी धुवून, स्वच्छ करुन उभे राहण्याची तयारी त्याने केली. पण या स्वच्छतेच्या कामानंतरच तो आजारी पडला. ९ ऑगस्टला त्याने कोरोनाची लस घेतली. तेव्हापासून त्याला सातत्याने ताप येत होता आणि तो तापातून उठण्याआधीच त्याच्यावर काळाने झडप घातली.
फेसबुकवर मुक्त लिखाण करणाऱ्या आदित्यचे खूप फॉलोअर्स होते. लेखांक देण्याची त्याची पद्धत इतरांपेक्षा वेगळी होती. त्याचा साखरपुडा झाला होता. चार महिन्यांनी लग्न होणार होते. आयुष्य हळूहळू मार्गी लागत होते आणि अचानक त्याने एक्झिट घेतली.