>> मनीष दळवी
असुर्डे : उघड्या डोळ्यांनी स्वत:चा संसार वाहून जाताना पाहावा लागला. आठ वर्षाची मुलगी आणि पत्नीसोबत तब्बल २५ तास पत्र्याच्या छतावर बसून काढले. पाण्याची तीव्रता बघून जगण्याची शाश्वती वाटत नव्हती. केवळ नशीब बलवत्तर म्हणून वाचलो. ज्यावेळी पाणी ओसरले, तेव्हा डिस्चार्ज झालेला मोबाईल वगळता आमच्याजवळ काहीही नव्हते. सगळा संसार पुराच्या पाण्याने वाहून नेला... कुणाच्याही डोळ्यात पाणी आणणारा हा प्रकार अनुभवला आहे चिपळूणनजीकच्या कळंबस्ते येथे राहणाऱ्या शिवाजी पवार यांनी. सगळा संसारच उद्ध्वस्त झाल्यामुळे गावी जाऊन राहिलेल्या शिवाजी पवार यांच्यापर्यंत मदतीचा दिलासाच पोहोचलेला नाही.
२२ जुलै रोजी कोकणामध्ये अतिवृष्टी झाली. यामध्ये चिपळूण तालुक्याला फार मोठा फटका बसला. चिपळूण शहर व परिसर होत्याचं नव्हतं झालं. अनेकांची घरे, वाहने व संसार वाहून गेला. आजही अनेकजण गाळ उपसण्याचे काम करीत आहेत. हजारो संस्था, दानशूर व्यक्ती, लाखो हात मदतीची आले, तरीही मदत अपुरीच पडत आहे. परिस्थिती निवळू लागल्यानंतर आता अनेकजणांनी अनुभवलेले थरारक अनुभव समोर येत आहेत. कळंबस्ते येथे राहणाऱ्या शिवाजी पवार यांचा अनुभव आता पुढे आला आहे.
पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींची मदत जाहीर; ठाकरे मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
शिवाजी पवार हे इलेक्ट्रिक इंजिनिअर असून, खेर्डी एमआयडीसी येथे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर गेली पाच वर्ष कार्यरत आहेत. कळंबस्ते भाग शाळेजवळ ते मुसाडचे विजय शिंदे यांच्या घरी ते भाड्याने राहतात. तुटपुंज्या वेतनावर ते कुटुंब चालवितात. त्यांनी सांगितलेला अनुभव अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आणणारा आहे.
दिनांक २१ व २२ जुलै ही आपल्यासाठी व कुटुंबासाठी काळ रात्र होती. सकाळीच चार वाजता भर झोपेमध्ये पायाला काहीतरी ओले लागले. म्हणून जाग आली. बाहेर अतोनात पाऊस पडत होता. मोबाईल चालू केल्यावर पाणी भरू लागले आहे हे जाणवले. त्यामुळे पलंगावर जाऊन बसलो. पण काही मिनिटातच पलंगापर्यंत पाणी आले. परिस्थिती गंभीर आहे हे लक्षात घेऊन पत्नी व आठ वर्षाच्या मुलीला सोबत घेतले. पाण्याने फुगलेला दरवाजा काही केल्या उघडत नव्हता. सर्व शक्ती पणाला लावून दरवाजा उघडला. रात्रीच्या अंधारात बायको, मी व लहान मुलगी जीव वाचवण्यासाठी बाहेर पडलो. बाजूच्या भाग शाळेची भिंत कोसळल्याने चालता येत नव्हतं. सर्वत्र पाणीच पाणी अखेर घराच्या बाजूने जाऊन एका झाडाचा आधार घेतला. प्रथम मुलीला झाडावरून घराच्या सिमेंट पत्रावरून बसविले. त्यानंतर बायकोला व नंतर मी वर गेलो. पाण्याचा वेग, तीव्रता बघता आपण वाचणार असणार नाही, असं वाटत होतं. आई-वडील व देवाचे स्मरण करत होतो.
पूरग्रस्त भागातील रस्ते दुरुस्तीला सुरूवात, गडकरींनी दिले 100 कोटी
पाणी वाढू लागल्याने बाजूच्या घराच्या पत्र्यावर जाऊन बसलो. ती सकाळ, पूर्ण दिवस व रात्र आम्ही तिघांनी पत्र्यावर बसून काढली. अतिशय वाईट विचार मनात येत होते. त्यातही एकमेकांना धीर देत होतो. पाणी कमी झाल्यावर बचाव कार्याची मदत झाली. आम्ही पत्र्यावरून उतरलो. सोबत केवळ डिस्चार्ज झालेले मोबाईल होता. पैसे, धड कपडे, चपला काहीही नव्हते. भरल्या डोळ्यांनी वाहून गेलेल्या संसाराकडे फिरून पाहिलं. काहीच उरलं नव्हतं. शेवटी वाट धरली.
कुणाही नातेवाईक किंवा मित्रांचे फोन लागत नव्हते. अखेर चालत चालत खेर्डी येथील मित्राच्या बहिणीकडे गेलो. तिच्या मेडिकलच्या दुकानातही पाणी शिरले होते. तरीही आमची कहाणी ऐकून तिलाही गहिवरून आले. तिने धीर दिला. औषधे, जेवण दिले. तीन दिवस निवारा दिला. त्यानंतर मोठ्या भावाला मुंबई येथे फोन लागला. त्याने लागलीच गाडीची व्यवस्था केली व पोफळी कोंडफणसवणे येथे त्याच्या घरी नेऊन ठेवले, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीला धावले पठाण बंधू; इरफान-युसूफ यांचा पुढाकार!
अजूनही शिवाजी पवार त्या मानसिक स्थितीतून सावरले नाहीत. ते पोफळी कोंडफणसवणे येथे राहत आहेत. चिपळूण शहर व परिसरात हजारो हात मदतीला आले. हजारो संस्था, दानशूर व्यक्ती यांनी सढळ हस्ते मदत केली आहे. परंतु शिवाजी पवारसारख्या बाहेरगावी गेलेल्या लोकांपर्यंत मदत पोहोचलेली नाही.