चिपळूण : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा चिपळूण तालुक्यालाही बसला. तालुक्यातील १५ ते २० गावात घरावरील पत्रे उडून गेले. तर काही ठिकाणी मोठी झाडे पडूनही घरांचे नुकसान झाले. दरम्यान, या वादळाच्या तडाख्यात महावितरणच्या चिपळूणला मुख्य वाहिनीत पेढांबे येथे बिघाड निर्माण झाल्याने रात्रभर वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणकडून युद्धपातळीवर दुरुस्ती सुरू होती. परिणामी चिपळूण आणि गुहागर तालुक्यातील दीड लाख ग्राहकांना अंधारातच रात्र काढावी लागली.
ताैक्ते चक्रीवादळाचा तडाखा तालुक्यास शनिवारी सकाळपासूनच जाणवत होता. सकाळी वारा सुरू झाला. तर पावसाचे प्रमाण कमी होते. दुपारनंतर वारा आणि पावसाचा जोर वाढला होता. दुपारपर्यंत विद्युत पुरवठा सुरू होता. त्यानंतर तो खंडित करण्यात आला. शनिवारी सायंकाळी व रात्रभर पावसाचा जोर कायम राहिला. रविवारी दुपारपर्यंत देखील पावसाच्या सरी कोसळत होत्या. यातच महावितरणच्या पेढांबे येथून चिपळूणमध्ये येणाऱ्या विद्युत वाहिनीत बिघाड निर्माण झाल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला. शनिवारी रात्री ९ ते ११पर्यंत विद्युत पुरवठा सुरू होता. त्यानंतर तो खंडित झाला. सोमवारी दुपारी तो पूर्ववत करण्यात आला. महावितरणच्या चिपळूण विभागीय कार्यालय अंतर्गत एकूण दीड लाख ग्राहक आहेत. यामध्ये चिपळूण तालुक्यातील १ लाख १० हजार, तर गुहागर तालुक्यातील ४० हजार ग्राहकांचा समावेश आहे.
पूर्व विभागातून वीज घेण्यास काही अडचणी निर्माण झाल्या तर लोटे एमआयडीसीतून चिपळूणात वीज घेतली जाते. मात्र, लोटे ते चिपळूण मार्गावर देखील १० विद्युत खांब कोसळल्याने लोटेतून वीजपुरवठा करता आला नाही. त्यामुळे चिपळूण आणि गुहागर तालुक्यातील लोकांना रात्र अंधारातच काढावी लागली. महावितरणकडून आपत्ती काळात कर्मचाऱ्यांची पथके तयार करण्यात आली होती. जिथे वीजपुरवठ्याची समस्या आहे, तिथे तत्काळ या कर्मचाऱ्यांना पाठविण्यात येत होते. दरम्यान वीजपुरवठा बंद राहिल्याने शहरात पालिकेकडून सकाळी पाणी पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे हाैसिंग सोसायट्यामधील नागरिकांची मोठी अडचण निर्माण झाली होती.
----------------------
चिपळूण शहरातील गोवळकोट रोड येथील विद्युत वाहिनी तुटून वीज खांब वाकले आहेत.