चिपळूण : माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज (शुक्रवारी) शिक्षक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शालेय विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. दूरचित्रवाणी व आकाशवाणीच्या माध्यमातून याचे प्रसारण झाले. तरीही सुविधांचा अभाव असल्यामुळे प्राथमिक शाळा या भाषणापासून काहीशा वंचितच राहिल्या. स्वतंत्र भारताच्या इतिहासात देशाच्या पंतप्रधानांनी प्रथमच विद्यार्थ्यांशी एकाचवेळी दूरचित्रवाणी व आकाशवाणीच्या माध्यमातून थेट संवाद साधला. त्यामुळे कुतुहलापोटी अनेक माध्यमिक शाळांतून हा प्रयोग यशस्वी झाला. मात्र, ग्रामीण भागात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये भाषण ऐकणे अवघड गेले. चिपळूण तालुक्यात ३६८ प्राथमिक शाळा आहेत. यातील ७५ टक्के शाळांचा वीज पुरवठा खंडित आहे. वीजबिल भरण्यासाठी निधी नसल्याने वीजपुरवठा सुरु नाही. शिवाय रेडिओ ही संकल्पना आता कालबाह्य झाली आहे. त्यामुळे रेडिओवर भाषण ऐकणे दुर्मीळ झाले. गणेशोत्सवाची सुटी असल्यामुळे विद्यार्थी उत्सवात मग्न आहेत. दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेकडून पंचायत समितीला मोदी यांच्या भाषणाबाबतचे पत्र प्राप्त झाले. केंद्रप्रमुखांच्या माध्यमातून ही पत्र शालेय शिक्षकांना देण्यात आली. त्यामुळे शिक्षकांना अनेक अडचणींना सामोरे जात पंतप्रधानांचे भाषण ऐकण्यासाठी प्रयत्न करावे लागले. परंतु, ग्रामीण भागात गणेशोत्सवासारखा कार्यक्रम सोडून विद्यार्थी शाळेकडे फिरकले नाहीत. काही शिक्षकांनीे जवळच्या घरात किंवा मंदिरात विद्यार्थ्यांना एकत्र करुन दूरचित्रवाहिनीवर भाषण ऐकविण्याचा प्रयत्न केला. ढगाळ हवामान, सातत्याने पडणारा पाऊस यामुळे ग्रामीण भागातील शाळांमध्ये व माध्यमिक विद्यालयामध्ये मोदी यांचे भाषण स्पष्ट ऐकू आले नाही. सातत्याने व्यत्यय येत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला. तालुक्यात ६७ माध्यमिक शाळा आहेत. माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना एकत्र बसवून हॉलमध्ये हे भाषण दाखवण्यात आले. पर्यावरण संतुलन व वीज बचत या मुद्द्यांवर भर देत पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांना त्यांनी विविध प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांनीही त्यांना प्रश्न विचारले. (प्रतिनिधी)वीज पुरवठ्यामुळे व्यत्यय...अनेक माध्यमिक शाळांमध्ये दाखविले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण. नाविन्यपूर्ण उपक्रमाचे शिक्षक व विद्यार्थीवर्गातून स्वागत. मोदींनी दिला पर्यावरण संरक्षण व वीज बचतीचा संदेश. विद्यार्थ्यांशी साधला थेट संवाद. ७५ टक्के प्राथमिक शाळांतील वीज पुरवठा खंडित असल्याने अडचण.अनेक शाळांमधून दूरचित्रवाणी संच नसल्याने गैरसोय. गणेशोत्सवाची सुटी असल्याने प्राथमिक शाळांमध्ये उदासिनता. ग्रामीण भागात खराब हवामान व पावसामुळे भाषण ऐकण्यात व्यत्यय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच पर्यायाने देशाच्या भावी पिढीशी संवाद साधण्याचा केलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. आतापर्यंत असा प्रयोग कोणीही केलेला नाही. त्यामुळे हा उपक्रम स्तुत्य आहे. अशा प्रकारचे मत सावर्डे हायस्कूलचे मुख्याध्यापक अन्वर मोडक, पोफळी हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. बी. गायकवाड, सती चिंचघरी हायस्कूलचे मुख्याध्यापक पी. व्ही. पाटील, पाग महिला विद्यालयाच्या मुख्याध्यापक प्रिया नलावडे, न्यू इंग्लिश स्कूल, पागचे मुख्याध्यापक टी. बी. पाटील यांनी व्यक्त केले.
चिपळूण -साहित्याचा अभाव : थेट संभाषणाचा प्रयोग इतिहासात प्रथमच
By admin | Published: September 05, 2014 10:50 PM