चिपळूण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मिनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याप्रमाणे बुधवारी मेडिकल, किराणा दुकानेवगळता बहुतांश बाजारपेठ बंद होती. मात्र, बाजारपेठ बंद असतानाही नागरिकांची गर्दी कायम होती.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने 'ब्रेक द चेन' अभियान सुरू केले आहे. त्यासाठी ६ एप्रिलपासून ३० एप्रिलपर्यंत मिनी लॉकडाऊन सुरू झाले आहे. परंतु बाजारातील गर्दी पाहता कोरोनाची साखळी खंडित होईल का, असा प्रश्न आहे. शहरामध्ये प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत बहुतांश व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत. अत्यावश्यक सेवेतील औषध दुकाने, किराणा, बेकरी, दुग्धजन्य पदार्थ, भाजी, मटण - मच्छी, मासे विक्रेते, फुल विक्रीचे व्यवसाय सुरू आहेत. याशिवाय हॉटेल्सच्या माध्यमातून होम डिलिव्हरीची सेवा सुरू आहे.
शहरातील अन्य दुकाने सकाळपासूनच बंद ठेवण्यात आली होती. परंतु मार्केट बंद असले तरी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होती. शहरातील चिंचनाका, नगर परिषद समोरील रस्ता, जुना स्टॅण्ड व मुख्य बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी आणि वाहतूक कोंडी होताना दिसून आली. बाजारपेठ बंद असली तरी अनेकजण शहरात फिरताना आढळून आले. मास्क वापरणाऱ्यांमध्ये वाढ झाली असून, मार्केट बंद असताना नागरिक गर्दी का करीत आहेत, असा प्रश्न आहेत. जुना स्टॅण्ड येथे भाजी खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी झाली. मिनी लॉकडाऊनमध्ये दळणवळणाची सेवा सुरू असल्याने लोकांचा मुक्त संचार सुरू आहे. दुचाकी, चारचाकी, रिक्षा, एस. टी. बस व अन्य वाहने सुरूच असल्याने ग्रामीण भागासह शहरातून मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत.