चिपळूण : येथील नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव पथकाने शुक्रवारपासून बाजारपेठेत पुन्हा अतिक्रमण विरोधी धडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत रस्त्यापर्यंत काढलेल्या शेड व काहींनी रस्त्यालगत मांडलेला दुकानातील माल हटविण्यात आला, तर काहींचा जप्त करण्यात आला. लवकरच बाजारपेठेतील उर्वरित भागातही कारवाई केली जाणार आहे.कोरोनाच्या परिस्थितीमुळे नगर परिषदेने बाजारपेठेतील अनधिकृत खोकेधारक व हातगाडीधारकां विरोधातील मोहीम थांबली होती. मात्र, काहींनी त्याचा फायदा उठवत मोठी दुकाने मांडली होती. काहींनी तर कायमस्वरूपी बांधकामे केली होती. याविषयी मोठी ओरड सुरू होती. अशातच नगर परिषदने पुन्हा एकदा ही कारवाई सुरू केली आहे. शुक्रवारी सकाळपासून नगर परिषद इमारत ते गांधी चौकादरम्यान ही मोहीम राबविण्यात आली. जेसीबी, डंपर व अन्य यंत्रणा लावून नगर परिषदेने ही कारवाई केली.या कारवाईला नगर परिषदेने सुरुवात करताच काहींची तारांबळ उडाली. मात्र, नगर परिषदेच्या इमारतीपासून सर्वच दुकानदारांवर सरसकट कारवाई केली. यामध्ये काहींनी रस्त्यापर्यंत मांडलेला माल जप्त करत कारवाई केली. तूर्तास गांधी चौकापर्यंतच ही मोहीम राबविण्यात आली.पुढील टप्प्यात चिंचनाका, मार्कंडी व नवीन बस स्थानकादरम्यान राबवली जाणार आहे. मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे, प्रमोद ठसाळे, नगर अभियंता परेश पवार, संदेश टोपरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
चिपळूण बाजारपेठेत अतिक्रमण हटाव मोहीम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 6:06 PM