चिपळूण : शहरासह तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. शहरासह ग्रामीण भागातही बाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले चिपळूण बाजारपेठ मंगळवारी अचानक बंद राहिली. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्यात आली. प्रशासनाने मंगळवारी बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून चिपळूण व्यापारी महासंघाने आवाहन केल्यानंतर शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत बंद पाळल्याचे दिसून आले.
शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने गेल्या चार महिन्यांपासून बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. गेले दीड वर्ष सातत्याने बाजारपेठा बंद ठेवाव्या लागत असल्याने व्यापारी संघटनांमधून तीव्रपणे रोष व्यक्त केला जात होता. बाजारपेठा सुरू करण्यास मान्यता द्या, अन्यथा आंदोलन करण्याच्या इशाराही व्यापारी संघटनांनी दिला होता. दरम्यान व्यापाऱ्यांच्या मागण्यांबाबत जिल्हाधिकारी ऑनलाइन बैठक घेत व्यापाऱ्यांशी संवाद साधला होता. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनीही व्यापाऱ्यांसमवेत प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक चिपळुणात घेतली होती. त्यानंतर त्वरित बाजारपेठा सुरू झाल्या. सायंकाळी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास मान्यता दिली होती. त्यानुसार गेली काही महिने बंद असलेली दुकाने सुरू झाली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी संपूर्ण दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याची साद पोलिसांकडून व्यापारी महासंघटनेला घालण्यात आली. व्यापाऱ्यांना सूचना येताच सोमवारी दुपारनंतर मंगळवारी बाजारपेठ बंद राहणार असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले. व्यापारी महासंघटनेनेही सर्व व्यापाऱ्यांना याबाबतची सूचना देत बंद पाळण्याचे आवाहन केले. त्यानुसार मंगळवारी सकाळपासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारच्या दुकानदारांनी बंदमध्ये सहभाग घेतला. किराणा दुकान, भाजीपाला, मेडिकल, दवाखाने, बँका, फळे आदी प्रकारची दुकाने सुरू होती. अत्यावश्यक सेवा वगळता बहादूरशेख नाक्यापासून गोवळकोटपर्यंतच्या तसेच शहर परिसरातील दुकानदारांनी बंदला प्रतिसाद दिला.