चिपळूण : येथील नगर परिषदेला राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून ७४ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला. या निधीविषयी शिवसेनेच्या नगरसेवकांनी खासदार विनायक राऊत यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार तातडीने हा निधी मंजूर करण्यात आला आहे.
दरवर्षी नगरपरिषदेला वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून निधी पुरविला जातो. त्यानुसार राज्य शासनाने १०० टक्के अनुदान नगर परिषदेला मंजूर केले आहे. या निधीतून महत्त्वाची विकासकामे मार्गी लागण्यास मदत होणार आहे. शासन निर्णयानुसार दहा लाख किंवा अधिक किमतीच्या कामास मान्यता देण्यात आली आहे. तसेच तांत्रिक व प्रशासकीय मान्यता असलेल्या कामांवर हा निधी खर्च करता येणार आहे. त्यानुसार या निधीतून इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोर खुला रंगमंच उभारणे, यासह आरसीसी गटार, संरक्षक भिंत, लोखंडी रिलिंगची कामे मंजूर करण्यात आली आहेत.