चिपळूण : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे. शहरातही रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. आजूबाजूचे शासकीय आणि खासगी कोविड सेंटर फुल्ल झाली आहेत. अशा परिस्थितीत चिपळूण नगर परिषदेने शहरात कोविड केअर सेंटर उभारावे, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष विद्यमान विधासभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांनी केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुका कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरत आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरात कोरोना प्रसाराचा वेग प्रचंड आहे. दररोज दुपटीने वाढणारी रुग्णसंख्या पाहता, चिपळूण शहरात सामूहिक संसर्गाची भीती आहे. दुर्दैवाने सामूहिक संसर्गाला सुरुवात झाली, तर मात्र परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच तयारी करणे आवश्यक असल्याचे कदम यांनी म्हटले आहे.
चिपळूण नगर परिषदेकडे स्वतःची आरोग्य यंत्रणा आहे. तसेच नगर परिषद मालकीच्या इमारती जागाही आहेत. त्यामुळे पुढील धोका ओळखून नगर परिषदेने स्वतःचे प्रयत्न करावे, असे कदम यांनी सांगितले. त्यासाठी गरज लागल्यास नगर परिषद अधिनियम ५८/२ कलमाचा वापर करून निधीची तरतूद करावी. सामाजिक संस्थांना विश्वासात घ्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे.