चिपळूण : येथील नगर परिषदेने घरपट्टी व पाणीपट्टी वसुली मोहीम सुरु केली आहे. या वसुली मोहिमेमध्ये ७० टक्के वसुली झाली आहे. शहरामध्ये जप्तीची कारवाई सुरु असून मार्कंडी, काविळतळी परिसरात एका दुकानाला व चार सदनिकांना सील मारण्यात आले आहे.घरपट्टी व पाणीपट्टी स्वरुपात मागील वर्षाच्या थकीत रक्कमेसह सुमारे ११ कोटी रुपयांची मागणी आहे. मात्र त्यातील न्यायालयीन प्रक्रिया व अन्य काही रक्कम वगळता सुमारे ९ कोटी रुपयाची प्रत्यक्ष वसुली अपेक्षित आहे. या विभागात वसुलीसाठी बाळकृष्ण पाटील यांची थेट शासनाकडून अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
गेले दोन महिने सातत्याने ही वसुली मोहीम राबविली जात आहे. नगर परिषदेची पाणीपट्टी थकित असलेल्या शहरातील ६० जणांना नोटीस बजावत त्यांच्याकडून लेखी हमीपत्र घेतले आहे. दोन दिवसात पाणीपट्टी न भरल्यास नळ कनेक्शन तोडू असा इशारा संबंधितांना दिला आहे. काहींनी दोन दिवसात पाणीपट्टी भरण्याची हमी दिली आहे.