चिपळूण : पंचायत समितीची सभापती निवड झाल्यानंतर आता उपसभापती निवडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विद्यमान उपसभापती पांडुरंग माळी सोमवारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.
महाविकास आघाडीच्या धाेरणानुसार उपसभापतिपद शिवसेनेकडे जाणार आहे. उपसभापतिपदासाठी विद्यमान तालुकाप्रमुख प्रताप शिंदे यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे.
माजी सभापती धनश्री शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर गुरुवारी सभापतिपदासाठी निवडणूक झाली. महाविकास आघाडीत यापूर्वी ठरलेल्या धोरणानुसार सभापतिपद राष्ट्रवादीकडे तर उपसभापतिपद शिवसेनेकडे राहणार आहे. त्यानुसार आता सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रिया कांबळे यांची वर्णी लागली. उपसभापती पांडुरंग माळी यांचा निर्धारित कालावधीत संपल्याने आणि सभापतिपदाची निवड झाल्याने ते सोमवारी राजीनामा देणार असल्याचे समजते. शिवसेनेत उपसभापतिपदासाठी तालुकाप्रमुख प्रताप शिंदे, गटनेते राकेश शिंदे आणि कोंढे गणातील खाडीपट्ट्याचे सदस्य सुनील तटकरे इच्छुक आहेत. उपसभापतिपदाबाबत अद्याप शिवसेना सदस्य अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक झालेली नाही. उपसभापतिपद शिवसेनेकडे असल्याने राष्ट्रवादीची केवळ बघ्याची भूमिका राहणार आहे.
आता अलोरे गणाचे शिवसेनेचे सदस्य आणि तालुकाप्रमुख प्रताप शिंदे यांचे नाव उपसभापतिपदासाठी आघाडीवर असल्याची चर्चा आहे. अलोरे गटाचाच दबदबा जास्त असल्याची चर्चा शिवसेनेच्या गोटात राहिली आहे. दुसरीकडे गटनेते राकेश शिंदे हेही उपसभापतिपदासाठी दावेदार आहेत. शिवसेना नेते त्यांना न्याय देणार का? याचीही कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे.