चिपळूण : एकीकडे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना शासकीय रुग्णालयात बेड उपलब्ध होत नाही. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांना खासगी रुग्णालयातच नाइलाजास्तव उपचार घ्यावा लागत आहे. किमान ५० हजार ते तीन लाख रुपये खासगी रुग्णालयात उपचारासाठी खर्च येत असल्याने रुग्णांसह नातेवाईक हैराण झाले आहेत.
सद्य:स्थितीत तालुक्यात एकूण ४६६ बेड उपलब्ध आहेत. कामथे उपजिल्हा रुग्णालय, वहाळ समाज कल्याण वसतिगृहात व मंदार एज्युकेशन सोसायटी येथे शासकीय स्वरूपात उपचार केले जात आहेत. कामथेतील १३० बेडसह वहाळ व पेढांबे येथे मिळून तालुक्यात ३०५ बेड उपलब्ध असून, तेथे शासकीय दरात उपचार केले जात आहेत. यामध्ये ६२ ऑक्सिजन बेड, तर अवघे ४ व्हेंटिलेटर बेड आहेत. याव्यतिरिक्त खासगीस्वरूपात २२० हून अधिक बेड उपलब्ध असून, त्यामध्ये १०८ ऑक्सिजन बेड, तर ४६ आयसीयू बेड उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत वाढती रुग्णसंख्या व यंत्रणेवर येणारा ताण लक्षात घेत ज्यांना लक्षणे नाहीत, अशा रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवले जात आहे.
सध्या तालुक्यात ९८७ जण बाधित असून, त्यातील ७४ जणांवर कामथे, ३३ वहाळ कोविड सेंटर, ३६ पेढांबे कोविड सेंटर, २८ श्री हॉस्पिटल, चौघांवर संजीवनी हॉस्पिटल, ११ लाइफ केअर हॉस्पिटल, एकावर जिल्हा रुग्णालय, २५ डेरवण हॉस्पिटल, ८ आयुसिद्धी हॉस्पिटल, २२ पुजारी हॉस्पिटल, दोघांवर गोवळकोट मदरसा, ८ सती येथील आयुसिद्धी हॉस्पिटल, ६ हॉटेल ग्रीन पार्क, तिघांवर पेढांबे येथील श्री साईश्रद्धा कोंविड सेंटर, ५ रामपूर श्री सिद्धिविनायक हॉस्पिटल, तर ७१८ जणांवर घरातच उपचार सुरू आहेत. १४३ रुग्ण सरकारी रुग्णालयात, १२६ रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
आतापर्यंत तालुक्यात ७ हजार ६७० जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यातील ६ हजार ४०८ जण बरे झाले आहेत.
.........................
पाच दिवसांत ५४८ नव्या रुग्णांची भर
गेल्या पाच दिवसांत येथे ५४८ नव्या रुग्णांची भर पडली असून, या कालावधीत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या २६९ जणांवर विविध कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. पाच दिवसांत बाधित रुग्णांची संख्या वाढली असतानाच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे.
..................................
अनामत रकमेवर अधिक भर
काही खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यासाठी आधी अनामत रक्कम भरण्यासाठी तगादा लावला जात आहे. त्यासाठी रुग्ण किंवा त्याच्या नातेवाइकांना उपचाराची रक्कम उभी करताना मोठी कसरत करावी लागत आहे. काही वेळा अडीच ते तीन लाख रुपये इतका खर्च करूनही रुग्णाचा मृत्यू होत आहे. या परिस्थितीने काही जण हैराण झाले आहेत.