अडरे/चिपळूण : चिपळूण एस. टी. आगाराचे चालक एस. एस. कांबळे हे जयगड - मुंबई गाडी घेऊन जात असता महाड राजेवाडी येथे पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत आपला मुलगा श्रीकांतसह वाहून गेले होते. आज (गुरुवारी) सकाळी त्यांचा मृतदेह आंजर्ले (ता. दापोली) येथील समुद्रकिनारी आढळून आला. त्यांची उत्तरीय तपासणी करुन पार्थिव अंत्यविधीसाठी त्यांच्या मूळ गावी मिणचे येथे नेण्यापूर्वी चिपळूण एस. टी. आगारात अंत्यदर्शनासाठी आणला होता. तेथे श्रध्दांजली अर्पण करताना कर्मचारी, अधिकाऱ्यांचेही डोळे पाणावले. दुपारी २ वाजून ११ मिनिटांनी चालक कांबळे यांचे पार्थिव एस. टी. आगारातील तांत्रिक कार्यशाळेत आणण्यात आले. यावेळी मोठी गर्दी झाली होती. नगराध्यक्षा सावित्री होमकळस, तहसीलदार जीवन देसाई, आगार व्यवस्थापक रमेश शिलेवंत, जिल्हाप्रमुख सचिन कदम, राष्ट्रवादीचे गटनेते राजू कदम, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजय देसाई, माथाडी कामगार सेनेचे सुधीर पालांडे, नगरसेवक इनायत मुकादम, आरोग्य सभापती आदिती देशपांडे, माजी उपनगराध्यक्ष लियाकत शाह, मंगेश शिंदे, काँग्रेस शहराध्यक्ष बाबू पिसे, उपाध्यक्ष फैसल पिलपिले, शिवसेना गटनेते, शहरप्रमुख राजेश देवळेकर, चिपळूण एस. टी. आगार कामगार संघटनेचे संजय रसाळ, रवींद्र लवेकर, शेषनाथ घाग, प्रकाश बल्लाळ, शिवसेना एस. टी. संघटनेचे प्रमोद नलावडे, शैलेंद्र सुर्वे, सुनील पवार यांच्यासह एटीए रणजित राजेशिर्के, सिध्दार्थ मोहिते, अ. ल. माळी व सावर्डे येथील कांबळे यांचे शेजारी यांनी त्यांना पुष्पहार अर्पण करुन श्रध्दांजली अर्पण केली. चालक कांबळे यांचे पार्थिव मिणचे या त्यांच्या मूळ गावी अंत्यविधीसाठी नेताना त्यांचा पुतण्या अतुल कांबळे, त्यांचे नातेवाईक, एस. टी. महामंडळाचे कार्यशाळेतील सुनील गमरे व विजय व्यवहारे दुपारी २.२६ वाजता रवाना झाले. यावेळी कर्मचाऱ्यांनी आपल्या लाडक्या सहकाऱ्याला साश्रूनयनानी निरोप दिला. (वार्ताहर) बोरिवली-राजापूर गाडीचे चालक जी. एस. मुंडे यांचे नातेवाईक आज गुरुवारी चिपळूण एस. टी. आगारात चौकशीसाठी आले होते. त्यांचा मेहुणा एम. एम. गुट्टे व संतोष गंगाधर गुट्टे यांनी आगार व्यवस्थापक शिलेवंत यांची भेट घेऊन मुंडे यांच्याबाबत चौकशी केली. त्यानंतर ते राजेवाडी येथील दुर्घटनास्थळी गेले. तेथे मुंडे यांचा मुलगा दीपक मुंडे व इतर नातेवाईक उपस्थित होते.
चिपळूण एसटी कर्मचाऱ्यांचे डोळे पाणावले
By admin | Published: August 05, 2016 12:45 AM