फोटो - चिपळूण बाजारपेठ दुसऱ्या दिवशीही सुनीसुनी होती. छाया : संदीप बांद्रे
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशीही वीकेंड लॉकडाऊनला लोकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. बाजारपेठेत कडकडीत बंद कायम होता. व्यापाऱ्यांनीही कडकडीत बंद पाळल्याने येथील बाजारपेठ सुनीसुनी होती.
शहरात शुक्रवारी रात्री पहिल्या वीकेंड लॉकडाऊनला सुरुवात झाली. प्रशासनाने त्याची अंमलबजावणी सुरू केली. महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी तसेच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
शनिवारी सकाळी खऱ्या अर्थाने वीकेंड लॉकडाऊनला सुरुवात झाली. नेहमी गजबजणारी चिपळूणची बाजरपेठ कडकडीत बंद ठेवली होती, तर खासगी वाहतूकही बंद असल्याने महामार्गासह शहरातील रस्ते सुनसान आणि निर्मनुष्य झाले होते. येथील किराणा व्यापारी तसेच भाजी फळे विक्रेत्यांनीही स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊनमध्ये सहभाग घेतल्याने फक्त मेडिकल आणि दूधवगळता सर्वकाही बंद होते.
रविवार असल्याने लोक घराबाहेर पडतीलच असा अंदाज वर्तवण्यात येत होता. परंतु दुसऱ्या दिवशीही नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. बाजारपेठेत कडकडीत बंद तर कायमच होता. वाहतूकही बंद होती. पूर्णतः शुकशुकाट पडला होता. विशेष म्हणजे मटण, चिकन, मच्छी व्यापार पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. रिक्षा व्यवसायही पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. तसेच एस.टी.च्या काही मोजक्या फेऱ्यावगळता एस.टी. सेवाही बंद होती. त्यामुळे ग्रामीण भागातील लोक दोन दिवस शहरात फिरकलेच नाहीत. शहरातील हॉटेल, उपाहारगृहे बंद असल्याने मजुरांचे मात्र हाल झाले.