चिपळूण : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन होत असल्याने चिपळूण शहरातील काही ठिकाणे प्रतिबंधित करण्यात येत असल्याचे आदेश तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी दिले आहेत. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी नगर परिषदेने भाजी मंडई, पानगल्ली ही ठिकाण सील केली.
शहरातील भाजीमार्केट, जुने एसटी स्टँड परिसर आणि पानगल्ली या ठिकाणी अत्यावश्यक सेवा म्हणून भाजीपाला, किराणा, फळे इत्यादी अत्यावश्यक सेवा सुरू आहेत; परंतु या ठिकाणी संबंधित आस्थापनांकडून कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन होत असल्याने या भागामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता गृहीत धरून तहसीलदार सूर्यवंशी यांनी वरील क्षेत्र पुढील आदेश होईपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. आदेशानुसार या क्षेत्रातील सर्व प्रकारचे दुकानदार यांना या ठिकाणी व्यवसाय करण्यास प्रतिबंधित करण्यात आले असून या आदेशाचा तसेच कोरोना नियमांचा भंग उल्लंघन केल्यास भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७, महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना नियम २०२० आणि नैसर्गिक आपत्ती अधिनियम २००५ अन्वये कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.