फोटो - खेर्डी येथील पंप हाऊसची बिलाल पालकर, परिमल भोसले, रोहन पालकर आदींनी पाहणी केली. (छाया : संदीप बांद्रे)
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : अर्ध्या चिपळूण शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खेर्डी येथील पंप हाऊस शेजारील वीज वाहिनीवर वृक्ष कोसळल्यामुळे रविवारी काही तास पाणी पुरवठा ठप्प झाला होता. तातडीने पाणी पुरवठा कर्मचारी आणि महावितरणचे कर्मचारी दाखल झाले व दुपारनंतर पाणी पुरवठा पूर्ववत सुरू केला.
संपूर्ण शहराला वाशिष्ठी नदी किनाऱ्यावरील गोवळकोट व खेर्डी येथील पंप हाऊसमधून पाणी पुरवठा केला जातो. खेर्डी येथील जॅकवेलमधून बाजारपेठ व उपनगर परिसरात पाणी पुरवठा केला जातो. या पंप हाऊसच्या नजीक असलेला जुनाट वृक्ष रविवारी सकाळी विद्युत वाहिनीवर कोसळल्याने अचानक वीजपुरवठा ठप्प झाला. त्यानंतर या पंप हाऊसमधून मुख्य साठवण टाकीकडे पाणी पुरवठा बंद झाला.
यावेळी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना तातडीने पाचारण करत दुरुस्तीचे काम करण्यात आले. यावेळी नगर परिषद पाणी पुरवठा सभापती बिलाल पालकर, नगरसेवक परिमल भोसले, रोहन पालकर आदींनी पंप हाऊस येथे जाऊन पाहणी केली व पाणी पुरवठा पूर्ववत सुरू होण्यासाठी पाठपुरावा केला. अखेर दुपारनंतर शहरातील पाणी पुरवठा सुरळीत चालू झाला.