चिपळूण : शहरातील रिक्षाचालक अभिजित गुरव याची आत्महत्या सावकारीचा बळी असल्याचे आता पुढे येत आहे. याविषयी चीड व्यक्त होत असतानाच शहरात सावकारी धंदा करून मदमस्त झालेल्या एका धनदांडग्याला गुरुवारी भरदिवसा महिलांनी एकत्र येत चांगलाच चोप दिल्याची चर्चा आहे. तो ज्या भाषेत बोलतो, त्याच भाषेत त्याहून अधिक गावरान भाषेत महिलांनी त्याचा अक्षरशः पाणउतारा केला. त्यामुळे सावकारी करणाऱ्यांचे धाबेच दणाणले आहेत.
चिपळुणात सावकारीचे मोठे रॅकेट आहे. लोकांची गरज लक्षात घेऊन पैसा द्यायचे; परंतु त्याची पठाणी वसुली करत दुप्पट-तिप्पट पैसे वसूल करायचे. वेळप्रसंगी धमक्या देणे, कर्जदाराच्या घरातील वस्तू उचलून आणणे, वाहने जप्त करणे असे एक मोठे रॅकेट चिपळूणमध्ये गेले काही वर्षांपासून कार्यरत आहे. समाजातील प्रतिष्ठा आणि भीतीमुळे या विषयात पुढे येऊन तोंड उघडण्यास कोण तयार नसल्याने त्या सावकारी रॅकेटचे चांगलेच फावले आहे. मात्र, आता शहरातील वडनाका येथील अभिजित गुरव या तरुणाने बुधवारी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्या चिठ्ठीत सावकारीच्या जाचाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे.
काही सावकारी करणाऱ्यांची नावेदेखील गुरव याने चिठ्ठीत लिहून ठेवली होती, अशी चर्चा आहे. या आत्महत्येमुळे आता सावकारी वसुलीला वाचा फुटली आहे. त्यातच सावकारी जाचामुळे एका उमद्या तरुणाचा बळी गेला आणि त्याचे कुटुंब उघड्यावर पडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. अशातच शहरात सावकारी करून मदमस्त झालेल्या एका धनदांडग्याला काही महिलांनी चोप दिला. मात्र, याविषयी उशिरापर्यंत कोणतीही तक्रार झाली नव्हती.