चिपळूण : नात्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून फरार झालेल्या मार्गताम्हाणे - पालशेतकरवाडी येथील तरुणाला वर्षभरानंतर पोलिसांनी मुंबईत सापळा रचून ताब्यात घेतले आहे. अटक करून मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव सुरेश पालशेतकर (३२, रा. मार्गताम्हाणे, पालशेतकरवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.त्याने आपल्याच नात्यातील अल्पवयीन मुलीवर मार्च २०१९ मध्ये बलात्कार केला होता. त्यानुसार त्याच्यावर ३१ जुलै २०१९ रोजी येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, या घटनेनंतर वैभव पसार होता. गावात घर अथवा त्याचे नातेवाईक नसल्याने तपासात अडचण निर्माण झाली होती. त्याचे मित्र व ग्रामस्थांकडून कोणतीही माहिती मिळत नव्हती. पोलीस त्याचा शोध घेत होते. परंतु, वर्षभरात त्याचा थांगपत्ता लागला नाही.कल्याण (मुंबई) परिसरातील एका रुग्णालयात वैभव नोकरी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या रुग्णालयात त्याचा पगार अडकला होता. त्यामुळे तो तेथे येणार असल्याची खात्री पटल्याने चिपळूण पोलिसांनी तेथेच तीन दिवस सापळा रचला. अखेर वैभव या रुग्णालयाच्या ठिकाणी येताच त्याला ताब्यात घेतले.
पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा शिंदे, पोलीस उपनिरीक्षक समद बेग, पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष शिंदे, पोलीस नाईक आशिष भालेकर, पंकज पडेलकर, महिला पोलीस आदिती जाधव यांनी ही कारवाई केली.