लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : शहरासह तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नाही. कामथे उपजिल्हा रुग्णालयात कंत्राटी तत्त्वावर असलेली कोविड लॅब बंद झाल्यानंतर स्वॅबचे नमुने डेरवण येथील प्रयोगशाळेत पाठविले जात होते. मात्र, डेरवण रुग्णालयाचा नकार नसतानाही हे नमुने आता मुंबईला पाठविले जात आहेत. दीड दिवसानंतर मिळणारे अहवाल तीन ते चार दिवसांनंतर येऊ लागले आहेत. त्यामुळे अहवाल येईपर्यंत बाधित नागरिक इतरत्र फिरत असल्याने काेराेना संसर्गाचा धाेका वाढला आहे.
तालुक्यातील सुरुवातीला कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर बाधित लोकांच्या संपर्कात आलेल्या लोकांचे स्वॅबचे नमुने घेऊन कोल्हापूर, तसेच सांगली येथे पाठविले जात होते. कोरोनाचे रुग्ण वाढत असताना जिल्ह्यात कोरोना चाचणी प्रयोगशाळा नसल्याने लोकप्रतिनिधींवर टीकेची झोड उठली होती. नंतर रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात ही प्रयोगशाळा सुरू झाली. जिल्ह्यातील सर्व स्वॅब येथेच तपासणीला पाठविले जात होते. दरम्यान, जिल्ह्यातच कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळल्याने उत्तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी चिपळुणात स्वतंत्र प्रयोगशाळेची मागणी सुरू झाली. त्यामुळे शासनाने एका खासगी कंपनीची नेमणूक करीत कामथे उपजिल्हा रुग्णालयात स्वॅब तपासणी लॅब सुरू केली होती.
तीन महिन्यांपूर्वी चिपळूण तालुक्यासह उत्तर रत्नागिरीतील खेड, गुहागर, मंडणगड, दापोली तालुक्यात शेकडो बाधित रुग्ण आढळत होते. तरीही कामथे येथील लॅबमधील स्वॅबचा अहवाल आठवड्याने १० दिवसांनी मिळत होता. स्वॅब दिलेले लोक अहवाल येत नसल्याने मोकाटपणे फिरत होते. यावेळी स्वॅब तपासणीचा पुरता खेळखंडोबा सुरू होता. प्रयोगशाळेची क्षमता दिवसाला २ हजार असताना जेमतेम ३०० लोकांचे अहवाल दिवसाला दिले जात होते. यावरून गदारोळ आणि आरोपांच्या फैरी झडू लागल्याने कामथे रुग्णालयातील लॅब बंद करण्यात आली. त्यामुळे रत्नागिरी येथेच स्वॅबचे नमुने पाठविण्यात येत होते. तिथेही चाचणीचा ताण वाढल्याने मंत्री उदय सामंत यांनी डेरवण रुग्णालयाशी संपर्क साधून स्वॅब तपासणी करण्याची विनंती केली होती. त्यानुसार आठवड्यानंतर डेरवण रुग्णालयात नमुने पाठविले जात होते. येथून अहवालही वेळेत मिळत होते. तपासणीलाही रुग्णालयाचा नकार नव्हता. ही प्रक्रिया सुरू असतानाच चिपळुणातील स्वॅब नमुने मुंबईला पाठविण्याच्या सूचना जिल्हास्तरावरून देण्यात आल्या. गेल्या तीन-चार दिवसांपासून येथील स्वॅबचे नमुने मुंबईला पाठविले जात आहेत.
----------------------
सावर्डेतील १२० जणांचे स्वॅब तीन दिवसांपूर्वी तपासणीला दिले होते. त्याचा अहवाल अद्याप मिळालेला नाही. प्रशासनाने कायमचा तोडगा काढून चिपळुणातच कोरोना चाचणीची प्रयोगशाळा उभारावी.
- पूजा निकम, पंचायत समिती, सदस्य, चिपळूण