चिपळूण : शहरात पार्किंगचा प्रश्न अद्यापही सुटला नसल्याने वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस भर पडत आहे. ही कोंडी दूर करताना पोलीस यंत्रणेलाही नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. वेडीवाकडी उभी राहणारी वाहने यामुळे वाहनचालक व पोलिसांमध्ये शाब्दिक चकमकही उडत आहे. चिपळूण नगर परिषद प्रशासनातर्फे काही ठिकाणी पार्किंग करण्यात यावे, असा प्रस्तावही गेल्या ६ महिन्यांपूर्वी झालेल्या सभेत घेण्यात आला. नगर परिषद प्रशासनातर्फे पार्किंगसाठी जागा आरक्षित असून, त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी होत नसल्याने वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस जटील बनत चालला आहे. शहरातील शिवाजी चौक रस्त्याचे रुंदीकरण झाले तरी या रस्त्यावर वाहने उभी राहात असल्याने पोलिसांनाही जागरुक राहून वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बाजारपेठेत काही विक्रेते रस्त्यावरच हातगाड्या उभ्या करत असल्याने पार्किंगचा प्रश्न जटील बनत चालला आहे.शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, काही ठिकाणी पार्किंग करु नये, असे फलक लावण्यात आले असले तरी या ठिकाणी पार्किंग केले जात असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. वाहतूक कोंडी दूर व्हावी, यादृष्टीने ९ ते १० वर्षांपूर्वी शहर व परिसरात सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली होती. मात्र, काही सिग्नल यंत्रणेचे भाग हे भंगारात गेले आहे.त्यामुॠे वाहतुकीचे तीनतेरा वाजल्याचे चिपळुण शहरात दिसून येते.सिग्नल यंत्रणा केवळ शोभेचे बाहुले म्हणून उभी आहे. नगर परिषद प्रशासन व पोलीस यंत्रणेच्या सहकार्याने शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे काही पादचाऱ्यांतून बोलले जात आहे. (वार्ताहर)
चिपळूणचा पार्किंग प्रश्न कागदावरच
By admin | Published: December 04, 2014 10:40 PM