चिपळूण : येथील नगर परिषद प्रशासनाने शहरातील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमण व रस्त्यावर बसणाऱ्या भाजी व्यावसायिकांविरोधात हटाव मोहीम हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर भाजी व्यावसायिकांनी निषेधार्थ दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून, याबाबत न्याय न मिळाल्यास भाजी व्यवसाय कायमस्वरुपी बंद ठेवण्यात येणार आहे. आज सकाळपासून व्यावसायिकांनी ठिय्या मांडला आहे.नगर परिषदेने गेली अनेक वर्षे भाजी व्यावसायिकांची दिशाभूल करुन अन्याय केला आहे. भाजी मंडईच्या पुढील बाजूला शॉपिंग मॉल व मागील बाजूस भाजी व्यावसायिकांना गाळ्यांची व्यवस्था केल्यामुळे आमच्यावर अन्याय झाला आहे, अशी महिती भाजी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुधीर शिंदे यांनी दिली.
शहरातील पूजा थिएटर येथे भाजी व्यावसायिकांची पत्रकार परिषद झाली. यावेळी श्रीरंग माजलेकर, प्रदीप आंब्रे, मारुती करंजकर, दत्तू वाळुंज, गणेश खंडझोडे, एकनाथ भालेकर, राजासाहेब तांबे, आरीफ बागवान यांच्यासह २५० ते ३०० भाजी विक्रेते उपस्थित होते.पूर्वीपासून भाजी व्यावसायिक येथे व्यवसाय करत आहेत. त्यांना हटविण्यात आल्यास त्यांनी करायचे काय? त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही निर्माण होईल. अगोदर भाजी व्यापाऱ्यांना जागा देऊन त्यांची व्यवस्था करावी. १९७९ साली भाजी मंडईचे उद्घाटन झाले. त्यावेळी ३७ गाळे होते. १९८५मध्ये इंदिरा सुपर भाजी मंडई या नावाने दुसरी भाजी मंडई तयार करण्यात आली. तेव्हापासून भाजी मंडईच्या बाहेर त्यावेळी ५ रुपये प्रतिदिन जागा भाडे होते.
भाजी विक्रेत्यांची संख्या हळूहळू वाढली. नगर परिषद प्रशासनाने लाखो रुपये खर्च करुन बांधलेल्या भाजी मंडई इमारतीची रचना चुकीच्या पद्धतीने केली आहे. ही भाजी मंडई नसून कोंबड्यांचा खुराडा आहे. सध्या भाजी मंडई गाळ्यांची लिलाव प्रक्रिया सुरु आहे. त्यातच सोमवारी अतिक्रमण हटाव मोहीम नगर परिषदेने हाती घेतली असून, या पार्श्वभूमीवर शहरातील बहादूरशेख नाक्यापासून ते मच्छीमार्केटपर्यंत असणाऱ्या भाजी व्यावसायिकांनी एकत्र येऊन दोन दिवस भाजी व्यवसाय बंद ठेवण्यात येणार आहे.