विहार तेंडुलकररत्नागिरी : काल-परवापर्यंत हवेमध्ये असलेला गारवा आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नाहीसा झाला आणि रत्नागिरी जिल्ह्यावर सूर्य कोपला. सोमवारी जिल्हाभरात या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. चिपळूणमध्ये तर सोमवारी जिल्ह्यातील सर्वाधिक तापमान होते. यापूर्वी कधीही चाळीसीचा आकडा पार न केलेल्या चिपळूणचे तापमान सोमवारी अचानक ४३पर्यंत वाढले. त्यामुळे रत्नागिरीकरांचा सोमवारी चांगलाच घाम निघाला.मार्च महिना सुरु झाला तरीही यावर्षी हवामानात गारवा होता. त्याचा परिणाम आंबा, काजू आदी पिकांवर झाला असला तरीही या सुखद गारव्यामुळे रत्नागिरीकर मात्र सुखावले होते. मात्र, सोमवारी अचानक तापमानात वाढ झाली. रत्नागिरीचे तापमान सोमवारी कमाल ३६, तर किमान २४ टक्के एवढे नोंदले गेले. त्याचबरोबर आर्द्रतेचे प्रमाणही ७८ टक्क्यांपर्यंत असल्याने रत्नागिरीकरांना उष्म्याचा सामना करावा लागला. सोमवारी वीज दिवसभर सुरु असतानाही अनेकजण हैराण झाले होते.जिल्ह्याच्या सर्वच भागात सोमवारी या हंगामातील सर्वाधिक तापमान नोंदले गेले तर चिपळुणात सोमवारी जिल्ह्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. चिपळूणचे कमाल तापमान हे ४३, तर किमान तापमान हे २६ अंश सेल्सिअस एवढे होते.
मात्र, आर्द्रतेचे प्रमाण कमी म्हणजेच ३८ टक्के एवढे असल्याने चिपळूणकरांना जास्त त्रास जाणवला नाही तरीही या हंगामातील सर्वाधिक तापमान असल्याने त्याची झळ मात्र सोसावी लागलीच. जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोलीचे कमाल तापमान हे ३३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २५ एवढे होते. आर्द्रतेचे प्रमाण हे ५३ टक्के होते.आर्द्रता वाढली की...,आर्द्रता वाढली की, घामाचे प्रमाण वाढते. त्यामुळे तापमान जास्त असले, पण आर्द्रतेचे प्रमाण कमी असेल तर उष्णता जास्त असली तरीही घामाच्या धारा लागत नाहीत. सोमवारी रत्नागिरीत चिपळूणच्या मानाने तापमान कमी होते. मात्र, चिपळूणच्या मानाने आर्द्रतेचे प्रमाण जवळपास दुप्पट होते. त्यामुळे सोमवारी चिपळूणपेक्षा रत्नागिरीकरांना उष्णतेचा आणि घामाचा अधिक त्रास सहन करावा लागला.