लाेकमत न्यूज नेटवर्क
राजापूर : शासनाने चिरेखाण व्यवसाय रॉयल्टीमध्ये केलेली वाढ व चिरेखाण व्यावसायिकांच्या प्रश्नांबाबत कोकण दौऱ्यावर येणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेण्यात येणार आहे. याबाबत तालुक्यातील ओणी येथे झालेल्या जिल्ह्यातील चिरेखाण व्यावसायिकांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
ओणी येथे राजापूर, संगमेश्वर, लांजा, सापुचेतळे भाग व पाली येथील चिरे व्यावसायिकांची सभा पार पडली. या बैठकीत शासनाने रॉयल्टीमध्ये केलेली पाच हजार रुपये वाढ, अठरा टक्के जीएसटी, दहा टक्के खनिकर्म विकास प्रतिष्ठान निधी आणि वाढवलेले बिनशेती कर यावर चर्चा करण्यात आली. भविष्यातील लीज परवाना पद्धत कदाचित येणार आहे, या बाबतीतही चर्चा करण्यात आली.
यासंदर्भात महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन वजा पत्र देण्याचे ठरले. त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्हा व सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सर्व लोकनियुक्त आजी - माजी आमदार यांनाही याबाबत निवेदन देण्याचे ठरले. त्याप्रमाणे बैठकीनंतर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना मेल पाठविण्यात आला. तर तालुक्यातील लोकप्रतिनिधींना द्यावयाची निवेदने या बैठकीत तालुकाध्यक्षांकडे देण्यात आली. त्याचप्रमाणे चिरे उत्खनन परवान्यातील त्रुटींवर चर्चा झाली. यासंदर्भात लोकप्रतिनिधींजवळ चर्चा करून त्याचा पाठपुरावा करण्याचे ठरले. त्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेणे व शक्य असल्यास कोकणच्या लोकप्रतिनिधींची एखादी बैठक घेण्याचे ठरले.
तसेच जांभा चिरा, गौण खनिज यादीमधून वगळता येतो का, यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेणे व त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे ठरले. या अनुषंगाने कोकण दौऱ्यावर येणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची चिपळूण येथे भेट घेण्याचे ठरले. तसेच यावर्षीच्या एकूणच वाढीव खर्चामुळे जांभ्या दगडाच्या दराबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर तालुका संघटनांनी घ्यावा असे ठरले. या बैठकीत जिल्हाध्यक्ष शशिकांत तथा दादा डोंगरे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
या सभेला जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष राजू जाधव, राजापूर तालुकाध्यक्ष बाबू सरफरे, संगमेश्वर तालुकाध्यक्ष अरुण बने, लांजा तालुकाध्यक्ष हनीफ नाईक, सापुचेतळे विभाग अध्यक्ष संदीप बने व तालुक्यातील पदाधिकारी आणि सदस्य त्याचप्रमाणे दापोली तालुक्यातून भाई पवार, विनोद गोंधळेकर, पांडुरंग बांद्रे, सुभाष घुबडे उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन प्रसाद मोहरकर यांनी केले.