लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : तालुक्यातील चिवेली येथे राबविण्यात आलेल्या नळपुरवठा पाणी योजनेत लाखोंचा घोटाळा झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. त्यावर तांत्रिक समिती नेमण्यात आली. या समितीने चिवेली येथील पाणी योजनेची पाहणी केली. पाहणीवेळी ठेकेदार उपस्थित राहत नाही. त्याला प्रशासन पाठीशी घालत असल्याचा आरोप तक्रारदार मुबिन महालदार यांनी केला आहे.
तालुक्यातील चिवेली येथे काही वर्षांपूर्वी नळपाणी पुरवठा योजना राबविण्यात आली होती. या योजनेत जलवाहिनी न बदलता जुन्याच जलवाहिनी दाखवून गैरव्यवहार केल्याचा आरोप तक्रारदार मुबीन महालदार व सिद्धेश शिर्के यांनी केला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी चिवेली येथे धाव घेत पाणी योजनेची प्राथमिक पाहणी केली होती. त्यावेळी पाणी योजनेची चौकशी करण्यासाठी तांत्रिक समिती देणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार तांत्रिक समितीत असलेले पुरवठा जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे उपाध्ये तसेच दोन शाखा अभियंता, चिपळूण येथील जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता गवस, आदींनी पाणी पाहणी केली. यावेळी तक्रारदार मुबिन महालदार, सरपंच योगेश शिर्के, पाणी योजनेचे सचिव राजू भोसले यांच्यासह संबंधित अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी तक्रारदार महालदार यांनी सांगितले की, गेल्या वर्षभरापासून केवळ पाहणी सुरू आहे. आम्ही त्याचा वारंवार पाठपुरावा करीत आहोत. मात्र त्यावर निश्चित कार्यवाही होत नाही. पाणी योजनेतील घोळ लोकांसमोर येत नाही. ठेकेदार लक्ष्मण बिराजदार पाहणीवेळी उपस्थित राहत नाहीत. त्यांना पाठीशी घालण्याचे काम सुरू आहे. पाहणीदरम्यान चिवेलीतील शिबेवाडी, गावठाणवाडी, शिर्केवाडी, बौद्धवाडी या चार वाड्यांतून टाकण्यात आलेली जलवाहिनी पाहण्यात आली. त्यावेळी नवीन जलवाहिनी टाकली नसल्याचे आढळले. तक्रारदारांनी १५ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेसमोर उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी तक्रारदारांना उपोषणापासून थांबविण्यासाठी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आम्ही उपोषणावर ठाम असल्याचे तक्रारदार महालदार यांनी सांगितले.
चिपळूण तालुक्यातील चिवेली येथे पाणी योजनेची तांत्रिक समितीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली.