लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : तालुक्यातील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये भरलेला समजून रिकामा ऑक्सिजनचा ड्युरा सिलिंडर लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. कोरोनाबाधित रुग्णांना त्रास होत असल्याचे लक्षात येताच तातडीने पर्यायी जम्बो सिलिंडर जोडण्यात आले. त्यामुळे अनर्थ होता होता टळला. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. लोटे येथील पुरवठादाराकडूनच रिकामा सिलिंडर पुरवठा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
कामथे कोविड सेंटरमधील ऑक्सिजन पुरवठ्याबाबत उडालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी शहानवाज शहा, राम रेडीज, संदेश मोहिते, सिद्धेश लाड आदींनी कामथे रुग्णालयात धडक देत या घटनेचा जाब विचारला. कामथे रुग्णालयास लोटे येथून ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. रुग्णालयामध्ये ४ ड्युरा सिलिंडर देणगी स्वरूपात मिळाले आहेत. एक ड्युरा सिलिंडर सहा तास प्राणवायू पुरवतो. आळीपाळीने १ सिलिंडर भरून आणला जातो. सोमवारीही संपलेला सिलिंडर लोटेतील वितरकांकडे पाठविण्यात आला. मात्र, त्यांनी हा सिलिंडर भरून न देता दुसऱ्याच कंपनीचा रिकामा ड्युरा सिलिंडर कामथे रुग्णालयास दिला. कामथेच्या ड्युरा सिलिंडरला इंडिकेटर्स आहेत. नेहमीचे सिलिंडर येत असल्याने कर्मचाऱ्यांचेही त्याकडे लक्ष नव्हते.
नवीन ड्युरा सिलिंडर लावला तरी रुग्णांमध्ये ऑक्सिजन वाढत नव्हता. नेमके हे कशामुळे होतेय. हे कोणाच्या लक्षात येत नव्हते. काही अधिकारी म्हणायचे की, ऑक्सिजन कधी कधी गोठतो. मात्र, कार्यकर्त्यांनी माहिती काढल्यानंतर असा प्रकार कधी होत नसल्याचे समजले. दरम्यान, तासाभराने जोडलेल्या ड्युरा सिलिंडरची पाहणी केली असता, तो वेगळ्याच कंपनीचा असून, रिकामा असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर रुग्णालयात दहा - पंधरा जम्बो सिलिंडर उपलब्ध होते. त्यातील ऑक्सिजन रुग्णांना देण्यात आला. यामुळे सुमारे ५० रुग्णांचा जीव भांड्यात पडला होता. विशेष म्हणजे हा गंभीर प्रकार घडला तेव्हा हॉस्पिटलचे मुख्य डॉ. भोईर हे हजर नव्हते. सुदैवाने रुग्णालयात जम्बो सिलिंडरचा स्टॉक असल्याने मोठा अनर्थ टाळला.
---------------------------
लोटे ते कामथे अशी सिलिंडर वाहतूक करताना दरड व पुराच्या पाण्याचा धोका संभवतो. खडपोली येथून ऑक्सिजनचा पुरवठा झाल्यास कोणत्याही अडचणी उद्भवणार नाहीत. मागणी करूनही कामथे रुग्णालयाचे इंडिकेटर असलेले सिलिंडर भरून मिळत नाहीत. पुरवठादाराने रिकामा सिलिंडर पाठवल्याने हा प्रकार घडला. त्यामुळे पुरवठादारात बदल करण्याची मागणी आम्ही प्रशासनाकडे करणार आहोत.
- डॉ. अजय सानप, कामथे उपजिल्हा रुग्णालय, चिपळूण