रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यातील राजकारण विरोधकांच्या भाजप व सेनेमधील संभाव्य प्रवेशाच्या चर्चेमुळे चांगलेच ढवळून निघाले आहे. खासदार नारायण राणे स्वाभिमानसह भाजपमध्ये जाणार का, भास्कर जाधव मातोश्रीवर गेले होते का? ते सेनेमध्ये किवा भाजपमध्ये प्रवेश करणार काय, राज्यात युती झाली नाही तर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड रत्नागिरी मतदरसंघातून निवडणूक लढविणार का, जिल्ह्यातून आणखी काही नेते सेना, भाजपच्या वाटेवर आहेत का, यांसारख्या प्रश्नांनी जिल्ह्याच्या राजकारणात थैमान घातले आहे.राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता आहे. केंद्रात पुन्हा भाजपची सत्ता आल्यानंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यातच इडा (ईडी) पिडा टळो आणि आपण प्रवेश करणार असलेल्याचे राज्य येवो असा अंतर्मनात घोष करीत करीत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा जोरात आहे.
केंद्राप्रमाणेच राज्यातही पुन्हा भाजप व सेना यांची सत्ता येणार असल्याचे वातावरण तयार करण्यात भाजप व सेनेला काही प्रमाणात यश आले आहे. त्यातच काहीजणांना आपल्याभोवती चौकशीचा ससेमिरा लागण्याची भीतीही वाटते आहे. त्यामुळे सत्तेत असणाऱ्या पक्षाची कवचकुंडले असली तर वाचण्याची शक्यता राहील. त्यामुळे विरोधी पक्षांमधील नेते भाजप व सेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा जोरात आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव हे रविवारी मुंबईत मातोश्रीवर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना भेटल्याची बातमी इलेक्ट्रॉनिक मीडियावरून झळकली अन चर्चेला उधाण आले. मात्र, असे काहीच नसल्याचे आमदार भास्कर जाधव यांना चाहते व कार्यकर्त्यांना फोनवर सांगावे लागले. चाहत्यांच्या प्रश्नांमुळे त्यांना हैराण व्हावे लागल्याचे त्यांनी नंतर माध्यमांच्या काही प्रतिनिधींना सांगितले. परंतु जाधव सेना किंवा भाजपमध्ये जाणार का, याबाबतची चर्चा अद्याप जिल्ह्यात सुरूच आहे.दुसरीकडे माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे हे त्यांच्या स्वाभिमान पक्षासह भाजपमध्ये दाखल होणार असल्याच्या चर्चेलाही उधाण आले आहे. अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच त्याबाबत गौप्यस्फोट केला आहे. राणे यांची गेल्या काही काळापासून राजकीय कोंडी झाली आहे.
ही कोंडी फोडण्याचा ते जोरदार प्रयत्न करीत आहेत. मात्र, राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास त्यांचे जे कट्टर विरोधक राजन तेली व संदेश पारकर हे भाजपमध्ये गेले आहेत, त्यांचा याला विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राणे यांना भाजपमध्ये प्रवेश देताना विरोध किती होणार, याची चाचपणी केल्याशिवाय राणे यांचा भाजप प्रवेश सुकर होण्याची शक्यता नसल्याचीही चर्चा सध्या सुरू आहे.राणे हे स्वाभिमानसह भाजपमध्ये येणार असतील तर त्यांचे पक्षाच स्वागतच आहे. मात्र, त्यांच्याबाबतचा निर्णय हा मुख्यमंत्री फडणवीस व पक्षाध्यक्ष अमित शहा हेच घेतील, असे भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी म्हटल्याने राजकीय चर्चेमध्ये आणखी रंग भरला आहे.तर रत्नागिरीतून प्रसाद लाडसेना व भाजपमध्ये इनकमिंग जोरात सुरू आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस व कॉँग्रेसमधील अनेकजणांनी भाजप प्रवेश केला आहे. काहीजणांनी भाजपऐवजी युतीमध्ये असलेल्या सेनेत प्रवेश केला आहे. दुसरीकडे खासदार नारायण राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेकडून कितपत सहकार्य मिळेल, याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.