रत्नागिरी : दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. आरोग्य विभागाकडून मास्क वापरण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र काही ठिकाणी नागरिकांकडून या आव्हानाकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या अधिकच वाढू लागली आहे.
बाल संरक्षण प्रशिक्षण
लांजा : रत्नागिरी जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत तालुक्यातील शिपोशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बालसंरक्षण प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी लांजा तालुका बालसंरक्षण अधिकारी कांबळे, अंगणवाडी पर्यवेक्षिका माळी आदींनी मार्गदर्शन केले.
अपघातांचे प्रमाण वाढले
देवरुख : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम पुन्हा थांबले आहे. मात्र काम सुरू असलेल्या भागात ठेकेदाराने सूचनांचा फलक लावलेला नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहन चालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. या मार्गावर फलक न उभारल्याने अपघातांची संख्या वाढु लागली आहे.
श्वानदंशाचे प्रकार वाढले
रत्नागिरी : शहर तसेच उपनगरात श्वानांचे प्रमाण वाढले आहे. रात्रीच्या वेळी हे श्वान झुंडीने इतरत्र फिरत असतात. काही वेळा दुचाकीस्वारांच्या अंगावरही धावून जात हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी श्वानांकडून लहान मुलांवर दंश होण्याचे प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
संस्कृत संभाषण वर्ग
चिपळूण : येथील संस्कृत भारती कोकण प्रांताच्यावतीने शहरातील डीबीजे महाविद्यालयात ८ ते १८ एप्रिल या कालावधीत तालुकास्तरीय संस्कृत संभाषण वर्ग आयोजित करण्यात आले आहेत. ९ ते १८ एप्रिलदरम्यान बापट आळी येथील माधवबाग येथे हा वर्ग होणार आहे.
गतिरोधकाची मागणी
देवरुख : शहरातील ग्रामीण रुग्णालय चौकात चार रस्ते एकत्र आले आहेत. तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, बसस्थानक आणि बाजारपेठ अशा महत्त्वाच्या चारही कार्यालयांकडून येणा-या या मार्गावर सतत वर्दळ सुरू असते. त्यामुळे या चौकात गतिरोधक बसविण्यात यावे अशी मागणी नागरिक करीत आहेत.
डांबरीकरणाचे भूमिपूजन
दापोली : जालगाव, गव्हे रस्ता डांबरीकरणाचे भूमिपूजन माजी आमदार संजय कदम यांच्या हस्ते नुकतेच झाले. गेल्या कित्येक दिवसांपासून या रस्ता डांबरीकरणाची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत होती. अखेर ही मागणी पूर्णत्वाला गेली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान पसरले आहे.
कांद्यांची आवक वाढली
रत्नागिरी : शहरातील अनेक भागांमध्ये सध्या बाहेरील कांदे विक्रेते मोठ्या प्रमाणावर आले आहेत. अनेक मार्गावर बसलेल्या या विक्रेत्यांकडून कमी दराने कांदे दिले जात असल्याने नागरिकांकडून कांदा खरेदीला प्रतिसाद मिळत आहे. १० किलोची पोती घाऊक प्रमाणात नागरिकांकडून खरेदी केली जात आहेत.
धुळीचा संसर्ग वाढला
रत्नागिरी : सध्या अनेक ठिकाणी रस्त्यांचे खोदकाम सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर धूळ निर्माण झाली आहे. या धुळीमुळे घशाचे तसेच डोळ्यांचे विकार वाढले आहेत. या धुळीचा त्रास मोठ्या प्रमाणावर होत असल्याने रस्ता दुरुस्ती कधी होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
पाणीटंचाई वाढली
खेड : तालुक्यातील दुर्गम भागात आता सार्वजनिक विहिरी आटल्या आहेत. तसेच पाण्याचे अन्य स्रोतही आटू लागले आहेत. एप्रिल महिना सुरू झाल्याने आता अनेक गावांमध्ये पाण्याच्या टंचाईला सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागातील महिलांना पायपीट करीत पिण्याचे पाणी आणावे लागत आहे.