रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील टीआरपीजवळ एका रस्त्यावर वासराचे मुंडके पडलेले सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार गुरुवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमाराला घडला असून, गाेवंशीय प्राण्याच्या हत्येच्या प्रकारामुळे नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. नागरिक आक्रमक झाल्याने पाेलिसांची जादा कुमक मागवून बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता.टीआरपीजवळ एका रस्त्यावर वासराचे मुंडके पडलेले काही नागरिकांनी पाहिले. या भागातून गेलेल्या एका टेम्पाेतून हे मुंडके खाली पडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, या प्रकाराची माहिती रत्नागिरीतील काही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना तसेच सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना मिळताच सर्वजण घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर हा प्रकार पाेलिसांना कळवताच पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, ताेपर्यंत नागरिकांची माेठ्या प्रमाणात गर्दी वाढली हाेती. जमावाला शांत करण्यासाठी पाेलिसांची जादा कुमक मागविण्यात आली हाेती.पाेलिसांनी नागरिकांशी चर्चा करून त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. याप्रकरणी संबंधितांचा शाेध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही पाेलिसांकडून सांगण्यात आले.मात्र, संतप्त नागरिकांनी हे प्रकार वारंवार घडत असूनही कारवाई का हाेत नाही, असा प्रश्न विचारला. तसेच या वाहनाचा शाेध घेऊन संबंधितावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात आली. या वाहनाचा तपास पाेलिसांकडून घेण्यात येत आहे. दरम्यान, नागरिकांचा जमाव रात्री ग्रामीण पाेलिस स्थानकावर धडकला हाेता.
रत्नागिरीत गोवंशीय हत्येवरून नागरिक आक्रमक, जमावाला शांत करण्यासाठी पाेलिसांची जादा कुमक मागवली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 12:34 PM