चिपळूण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील नगरपरिषदेमार्फत शहरातील पवन तलाव मैदानावरील शॉपिंग सेंटर येथे सुरू असलेल्या लसीकरण केंद्रात येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. लसीकरणाच्या यादीत नाव येण्यासाठी पहाटेपासून हजेरी लावावी लागत आहे. त्याशिवाय पिण्याच्या पाण्याची व बैठक व्यवस्था नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
सध्या शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे शहरात लसीकरणावर अधिक भर देण्यात आला आहे. तूर्तास कामथे उपजिल्हा रुग्णालयातील लसीकरण सेंटर बंद करून पवन तलाव मैदानावरील शॉपिंग सेंटरमध्ये सुरू असलेल्या नागरी लसीकरण केंद्राची क्षमता वाढविण्यात आली आहे. सुरुवातीला या केंद्रात केवळ १५० लसी उपलब्ध होत होत्या. मात्र, आता वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन, २०० डोस दिले जात आहेत. यामध्ये १०० डोस दुसऱ्यांदा लस घेणाऱ्यांना, तर १०० डोस पहिल्यांदा लस घेणाऱ्यांना दिले जात आहेत. मात्र आता या लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी दिवसेंदिवस वाढू लागली आहे.
लसीकरणासाठी यादीत नाव यावे म्हणून पहाटेपासूनच काहीजण हजेरी लावत आहेत. काही ज्येष्ठ नागरिकांनाही रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्यातच कडक उन्हामुळे सतत तहान लागत असल्याने, पिण्याच्या पाण्याची सोय व बैठक व्यवस्था नगरपरिषदेने करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.
चौकट
लसीकरण केंद्राचे आज स्थलांतर
नागरी आरोग्य केंद्र १७ एप्रिलपासून शहरातील एल टाईप शॉपिंग सेंटर येथे स्थलांतरित करण्यात येत आहे. याविषयी नगरपरिषद आरोग्य समिती सभापती शशिकांत मोदी यांनी सांगितले की, या नवीन केंद्रात तूर्तास ७० खुर्च्या, पंखे, पाण्यासाठी कुलर व अन्य सुविधा उपलब्ध केल्या आहेत. शनिवारपासून या नवीन केंद्रात लसीकरण केले जाणार आहे.
.........................
फोटो -
चिपळूण नगरपरिषदेच्या नागरी आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी नागरिकांना अनेक तास ताटकळत उभे राहावे लागत आहे.