लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनाला प्रतिबंध करणारी कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्हीही लसी कोराेनाला थोपविण्यासाठी परिणामकारक आहेत. मात्र, तरीही अनेक नागरिक आपल्याला कोविशिल्ड लसचा डोस हवा, यासाठी आग्रही राहत असल्याने या लसीची मागणी वाढली आहे.
देशात कोरोनाला थोपविण्यासाठी लसचा शोध सुरू झाला. केवळ देशातच नव्हे तर जागतिक स्तरावर लस निर्माण करण्याची आत्यंतिक गरज निर्माण झाली. याचवेळी निर्माण झालेल्या कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन लसींच्या आपत्कालीन वापरास मान्यता देण्यात आली. या दोन्ही लसी कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी प्रभावी असल्या तरीही त्यांची वैशिष्ट्ये वेगवेगळी आहेत. कोवॅक्सिन ही लस भारत बायोटेकने आयसीएमआर आणि पुण्यामधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलाॅजीसोबत मिळून विकसित केली आहे तर कोविशिल्ड ही लस ऑक्सफर्ड विद्यापीठाने ब्रिटिश - स्वीडीश कंपनीने एस्ट्राजेनेकासोबत विकसीत केली आहे. पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट याचे उत्पादन करत आहे.
सध्या सर्वत्र कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड अशा दोन्हीही लस नागरिकांना देण्यात येत आहेत. या दोन्ही लस कोरोनावर अतिशय परिणामकारक आहेत. मात्र, तरीही काहीजणांकडून कोवॅक्सिनपेक्षा कोविशिल्ड लसला अधिक पसंती दिली जात आहे.
कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्हीही लस कोरोनावर अतिशय प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे आपल्याकडे जी लस उपलब्ध होईल, त्या लसीचे दोन्ही डोस पूर्ण करून प्रत्येकाने कोरोनापासून सुरक्षित होणे, काळाची गरज आहे. लसीकरण अधिकाधिक नागरिकांचे झाल्यासच आपल्याला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना यशस्विरित्या करता येईल. त्यामुळे जी लस उपलब्ध असेल, ती लस नागरिकांनी घेऊन कोरोनाशी सामना करावा.
- डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्यचिकित्सक, रत्नागिरी
ज्यांच्या रक्ताच्या गुठळ्या झाल्या आहेत किंवा ज्यांची त्यावर ट्रीटमेंट सुरू आहे, अशांना कोवॅक्सिन लस देता येत नाही.
कोविशिल्ड लस अँटिबाॅडी आणि मेमरी सेल्स विकसित करते.
कोविशिल्डने कोवॅक्सिनपेक्षा जास्त अँटिबाॅडीज तयार होतात, असे संशोधनातून निष्पन्न झाले आहे.