खेड : डाेस घेण्यासाठी आलेल्यांन डाेस शिल्लक नसल्याचे सांगून तिघांना परत पाठविण्याचा प्रकार २४ मार्चराेजी काेरेगाव प्राथमिक आराेग्य केंद्रात घडला हाेता. मात्र, या आराेग्य केंद्रात केवळ ८ व्हायल वापरण्यात आल्याची बाब समाेर आली असून, त्यातीलही सहा डाेस शिल्लक राहिल्याची माहिती पुढे आली आहे. डाेस शिल्लक असतानाही केवळ आराेग्य कर्मचाऱ्यांच्या अनास्थेमुळे ज्येष्ठ नागरिकांना माघारी परतावे लागल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे.
तालुक्यातील लसीकरण मोहिमेत काही केंद्रांनी आघाडी घेतली असून, नागरिकही कर्तव्य समजून लसीकरणासाठी पुढे येत आहेत. मात्र, कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणासाठी आलेल्या तीन नागरिकांना परत पाठवल्याचा प्रकार घडला होता. यावेळी संबंधित कर्मचाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता, त्यांनी आता संध्याकाळचे चार वाजून गेले आहेत तसेच डोस शिल्लक नसल्याने नवीन व्हायल उघडावी लागेल व तुम्ही तिघेच असल्याने उर्वरित डोस फुकट जातील, अशी सबब सांगितली होती.
मात्र, ८ मार्चपासूनच्या लसीकरणाच्या अहवालाची माहिती घेतली असता, २४ मार्चरोजी कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण मोहिमेसाठी २७० डोस म्हणजेच २७ व्हायल उपलब्ध होत्या. त्यापैकी ८ व्हायल वापरण्यात आल्या असून, ७४ डोस लाभार्थ्यांना देण्यात आले. मात्र, ८ वी व्हायल उघडल्यानंतर केवळ चारजणांना लस देण्यात आली, तर सहा डोस शिल्लक राहिले. डोस शिल्लक असूनही केवळ वेळ संपल्याचे कारण देऊन कर्मचाऱ्यांच्या अनास्थेमुळे नागरिकांना परत जावे लागल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, यावेळी उपस्थित प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना डोस शिल्लक नसून, नवीन व्हायल उघडावी लागेल, असे धडधडीत खोटे सांगून शासनाला भुर्दंडात पाडले. दैनंदिन लसीकरण अहवालात जर सहा डोस शिल्लक राहिले हाेते, तर वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन मोरे यांना लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी खोटी माहिती दिली आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. खाेटी माहिती देणाऱ्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना आरोग्य विभाग पाठीशी घालत असल्याची चर्चा तालुक्यात सुरू असून, जिल्हा आरोग्य अधिकारी याबाबत काय कारवाई करतात, हेच पाहायचे आहे.