राजापूर शहरात एक जण वाहून गेला आहे .
लाेकमत न्यूज नेटवर्क
राजापूर : रविवारपासून पडणाऱ्या पावसामुळे राजापूर तालुका आणि शहर परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अर्जुना आणि काेदवली नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्याने राजापूर शहराला वेढा घातला आहे. शहरातील जवाहर चाैकात पुराचे पाणी शिरले असून, पुराच्या पाण्यात एक जण वाहून बेपत्ता झाला आहे. तर अर्जुना नदीच्या पाणीपातळीत वाढ हाेत असल्याने मुंबई - गाेवा महामार्गावरील राजापूर पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्याने या वर्षी दुसऱ्यांदा शहराला वेढा घातला आहे. रविवारी रात्री उशिरा जवाहर चौकामध्ये धडक देणाऱ्या पुराच्या पाण्याने साेमवारी सायंकाळपर्यंत ठिय्या मांडला आहे. जवाहर चौकात पुराच्या पाण्याचा सुमारे २४ तासांहून अधिक काळ शहराला वेढा राहिला आहे. संततधार पावसाने पूरस्थितीमध्ये वाढ होत असल्याने व्यापाऱ्यांची त्रेधातिरपीट उडविली आहे.
शहरातील बंदरधक्का, मुन्शीनाका परिसर, वरचीपेठ परिसर, शिवाजीपथ, भटाळीतील कोदवली नदीलगतचा भाग, गुजराळी आदी भाग पुराच्या पाण्याखाली आहे. तर, शहरालगतचा शीळ, गोठणेदोनिवडे-चिखलगाव आदी गावांचा संपर्क तुटला आहे. उन्हाळे, दोनिवडे पंचक्रोशीतील गावांना जोडणारा रस्ताही पाण्याखाली गेल्याने त्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. नद्यांच्या काठावरील भातशेती पाण्याखाली गेली आहे. दरम्यान, नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे, तहसीलदार प्रतिभा वराळे आदींनी शहरातील पूरस्थितीची पाहणी करून लोकांसह व्यापाऱ्यांना सतर्कततेचा इशारा दिला आहे.
शिवाजी पथ रस्त्यावरील अनेक दुकानांमध्ये पुराचे पाणी घुसले. पाणीपातळीत वाढ झाल्याने व्यापाऱ्यांनी दुकानामध्ये पाणी घुसण्याच्या शक्यतेने तातडीने दुकानातील माल सुरक्षित ठिकाणी रात्रीच हलविला. त्यामुळे व्यापाऱ्यांचे फारसे नुकसान झालेले नाही.
राजापूरच्या तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी माहिती देताना सांगितले की, पुराच्या पाण्यात कोंढेतड पुलाजवळून सोमवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास एक जण वाहून गेला असून, त्याचा शोध सुरू झाला आहे. अंदाजे ४५ वर्षे वयाचा पुरुष असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
------------------------
काेल्हापूर मार्ग बंद
राजापूर तालुक्यातील रायपाटण येथे अर्जुना नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे ओणी - अणस्कुरा कोल्हापूर मार्गावर सौंदळ, रायपाटण या ठिकाणी रस्त्यावर पाणी आले आहे. त्यामुळे हा मार्ग बंद पडला आहे. तर रायपाटण येतील एका पुलावर पाणी आल्याने काही वाड्यांचा संपर्क तुटला आहे.
------------------------
पुराचे पाणी शेतात
राजापूर तालुक्यातील तारळ प्रिंदावण भागातून वाहणाऱ्या सुक नदीनेही धोक्याची पातळी ओलांडल्याने पुराचे पाणी मळे शेतीमध्ये घुसले आहे. या ठिकाणीही अनेक शेतकऱ्यांची अवजारे वाहून गेल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सुक नदीचे पाणी शेतामध्ये घुसून या भागातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.