राजापूर : पावसाची संततधार सुरूच असल्याने राजापूर तालुक्यातील अर्जुना व कोदवली नदीच्या पाणी पातळीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी पुराचे पाणी राजापूर शहरात शिरले होते. शहरातील मुख्य चौकाला पाण्याचा वेढा पडला होता.गेले चार दिवस जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. चिपळूण, खेड, संगमेश्वर, राजापूर तालुक्यातील नद्यांचे पाणी वाढले होते. चिपळूण, संगमेश्वर आणि राजापूर शहरात पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.
मात्र, सोमवारी रात्रीपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने मंगळवारी पुराचे पाणी ओसरले होते. त्यामुळे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आले होते. त्यातच मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने नद्यांच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली आहे.राजापूर तालुक्यातील अर्जुना व कोदवली नद्यांना पुन्हा पूर आला असून, पुराचे पाणी राजापू शहरातील जवाहर चौकापर्यंत आले आहे. पाण्याची पातळी वाढत असल्याने व्यापारी व नागरिक सतर्क झाले आहेत. प्रशासनही सतर्क झाले असून, नागरिकांना व व्यापाऱ्यांना सावधानतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.