मंडणगड : तालुक्यातील म्हाप्रळ खाडीपात्रात सक्शन पंपाने अवैध रेती उत्खनन व साठा करणाऱ्या पाचजणांविरोधात मंडणगड महसूल पथकाने पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हे दाखल केले आहेत. त्याचबरोबर जप्त करण्यात आलेले सक्शन पंप खाडी किनारी आणणे कठीण असल्याने ते तेथेच बुडवून टाकण्यात आले.महसूल विभागाने गुरुवारी ( दि. ७) म्हाप्रळ रेती बंदर परिसरात केलेल्या धडक कारवाईनंतर म्हाप्रळचे मंडल अधिकारी अनिल कुळे यांनी मंडणगड पोलिस ठाण्यात पाच संबंधितांविरोधात तक्रार दाखल केली. महसूल विभागाने गुरुवारी पहाटे सव्वापाच वाजता तहसीलदार कविता जाधव यांच्या नेतृत्वाखाली म्हाप्रळ रेती बंदर परिसरात सावित्री नदीपात्रात आंबेत पुलानजीक कारवाई केली. खाडीची पाहणी करताना खाडीपात्राशी सुमारे दहा ब्रासचा वाळूसाठा आढळला. त्याची किंमत सुमारे तीस हजार इतकी आहे. तो साठा महसूल विभागाने जागेवर पंचनामा करून ताब्यात घेतला.यानंतर म्हाप्रळ येथील नियाज मांडलेकर यांच्या बोटीने महसूल विभागाचे पथक खाडीत शिरले. खाडीच्या मध्यभागी पाच सक्शन बोटी ड्रेझरजवळ उभ्या होत्या. खाडी किनारी असलेला साठा या पंपांच्या मदतीने झाला असल्याचे त्यातून स्पष्ट होत होते. पाण्यास ओहोटी असल्याने पंप खाडी किनारी आणणे अडचणी असल्याने पाचही सक्शन पंप पंचनामा करून खाडीत बुडविण्यात आले़, असे कुळे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.याबाबत जब्बार चरफरे (आंबेत, ता. म्हासळा, जि़. रायगड), जहूर मुकादम (म्हाप्रळ), नियाज म्हाळुंगकर (म्हाप्रळ), हसन मुकदाम (म्हाप्रळ), इब्राहिम मुकादम (म्हाप्रळ, ता़ मंडणगड) यांच्याविरुद्ध मंडणगड पोलीस ठाण्यात भादवि कलम ३७९, ३४ महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६चे कलम ४८(७), ४८(८) अन्वये गुन्हा दाखल केला आहे़ पोलिस निरीक्षक प्रदीप मिसर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)वाळूसाठा ताब्यातमहसूल खात्याने केलेल्या कारवाईमुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहेत. उत्खननाने काम पूर्णपणे बंद झाले आहे. या कारवाईमुळे काही दिवस तरी हा अनधिकृत व्यवसाय बंद राहण्याची शक्यता आहे.वाळू साठा पंचनामा करुन ताब्यात घेतला आहे.
रेती उत्खनन बंद; पाचजणांविरुद्ध गुन्हा
By admin | Published: April 08, 2016 11:51 PM