दर्शनासाठी भाविक रांगेत
रत्नागिरी : श्रावणातील पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील विविध शिव मंदिरात नामसप्ताहास प्रारंभ झाला आहे. कोरोनामुळे शासकीय नियमावलीचे पालन करण्यात येत असून भाविक सोशल डिस्टन्सिंग ठेवून दर्शनासाठी रांगा लावत आहेत. मास्क वापरणे सक्तीचे असून, सॅनिटायझरचा वापर केला जात आहे.
महागाईचा फटका
रत्नागिरी : इंधन दरात होणाऱ्या सातत्यपूर्ण वाढीमुळे वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे महिन्यावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवास महागाईची झळ बसणार आहे. बाप्पाच्या मूर्तीसाठी लागणारे साहित्य, मजुरीचे दर वाढल्याने दरवर्षी ५ ते १० टक्क्यांनी होणारी वाढ यावर्षी २० टक्क्यांवर पोहोचली आहे.
विद्या आठवलेंचे यश
रत्नागिरी : अखिल भारतीय शिक्षक साहित्य, कला-क्रीडा मंडळ कोकण विभाग आयोजित राज्यस्तरीय काव्यगायन स्पर्धेत लांजा न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर काॅलेजच्या साहाय्यक शिक्षिका विद्या आठवले यांनी द्वितीय क्रमांक मिळविला आहे. त्यांचे यशाबद्दल काैतुक करण्यात येत आहे.
खासगी वाहतुकीचा पर्याय
राजापूर : राजापूर आगारातून लांब पल्ल्याच्या कोल्हापूर, सांगली, पुणे गाड्या सुरू करण्यात आल्या असल्या तरी ग्रामीण भागातील बसेस मात्र भारमानाअभावी बंद ठेवण्यात आल्या आहेत. परिणामी प्रवाशांना खासगी वाहतुकीचा पर्याय स्वीकारावा लागत आहे.
पूरग्रस्तांची आरोग्य तपासणी
चिपळूण : येथील काॅंग्रेस पक्ष व मुंबई काॅंग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली आहे. पूरग्रस्तांच्या आरोग्य सुरक्षेसाठी तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत २५० पूरग्रस्तांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली.
नाैका बांधणी केंद्राची मागणी
रत्नागिरी : गुजरात व तामिळनाडू राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात खोल समुद्रात मासेमारी करू शकणाऱ्या आधुनिक स्टील नाैका बांधणी केंद्र रत्नागिरीत व्हावी, अशी मागणी येथील मच्छीमारांनी केली आहे. केंद्र शासनाच्या या योजनेची अंमलबजावणी राज्यात होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.
आंदोलनाचा इशारा
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांच्या कोरोना चाचणीचा वैद्यकीय अहवाल उशिरा प्राप्त होत आहे. वेळेवर अहवाल प्राप्त न झाल्यास आंदोलनाचा इशारा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष रूपेश कदत यांनी दिला आहे.
सायबर कॅफेत गर्दी
रत्नागिरी : सध्या आयटीआयसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शिवाय डीएड पास शिक्षकांना नोकरीसाठी टीईटी परीक्षा द्यावी लागत असल्याने सायबर कॅफेत अर्ज भरण्यासाठी विद्यार्थी गर्दी करीत आहेत. गर्दी टाळण्यासाठी अर्ज भरणाऱ्या अर्जदारांना घ्यावी लागत आहे.
फळांना मागणी
रत्नागिरी : श्रावण सुरू असल्याने भाविक उपवास करीत आहेत. उपवासाला शक्यतो फलाहार केला जात असल्याने फळांना विशेष मागणी होत आहे. केळी, सफरचंद, माेसंबी, पपई, सीताफळ, अननस, पेर, चिकू, पेरू बाजारात उपलब्ध असून, दर मात्र कडाकडले आहेत.