चिपळूण : सफाई कामगार म्हणून ताे वडिलांच्या जागेवर अनुकंपाखाली रुजू झाला़ शैक्षणिक पात्रतेमुळे त्याच्यावर आराेग्य विभागाची जबाबदारीही साेपविण्यात आली़ त्याच वेळी शिकण्याची जिद्द मनात असल्याने अभ्यास करून आराेग्य निरीक्षक पदाचे शिक्षण पूर्ण केले़ ही परीक्षा उत्तीर्ण हाेताच महेश मधुकर जाधव याची चिपळूणच्या आराेग्य निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली़
महेश जाधव यांचे वडील मधुकर जाधव हे नगर परिषदेत सफाई कामगार म्हणून काम करीत होते. तब्बल ३३ वर्षे त्यांनी सेवा बजावली. सेवानिवृत्त झाल्यानंतर अनुकंपाखाली महेश जाधव हे या सेवेत रुजू झाले. सफाई कामगार म्हणून रुजू झाले तरी शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांच्याकडे आरोग्य विभागातील अन्य कामांची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्याचवेळी त्यांनी मुंबईतील अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत आरोग्य निरीक्षक पदाचे शिक्षण पूर्ण केले. तीन वर्षांपूर्वीच ते परीक्षेत उत्तीर्ण झाले होते. मात्र, राज्य शासनाकडून यादी न आल्याने ही नियुक्ती रखडली हाेती़ त्यामुळे त्यांची आरोग्य निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली नव्हती.
यापूर्वी आरोग्य निरीक्षक अनंत हळदे व अशोक साठे हे नगर परिषदेचे कामकाज पाहत होते. मात्र, तीन वर्षांपूर्वी ते सेवानिवृत्त झाल्याने हे पद रिक्त होते. आता या पदाची जबाबदारी जाधव यांच्यावर सोपविण्यात आली आहे. नगर परिषदेत ११ वर्षे सफाई कामगार म्हणून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या महेश जाधव यांची आराेग्य निरीक्षकपदी नियुक्ती हाेताच नगर परिषद कर्मचारी संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला़ त्यासाठी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे व मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांनी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले.
-------------------------
चिपळूण नगर परिषद आरोग्य निरीक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल महेश जाधव यांचा नगर परिषद कर्मचारी संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला.