अडरे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे चिपळूण तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चिपळुणात स्वच्छता अभियान कार्यक्रम राबविला, तसेच चटई व ताडपत्रीचे वाटप करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात भाजपतर्फे विविध कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत. यामध्ये भाजप चिपळूणतर्फे स्वच्छता अभियान कार्यक्रम राबविण्यात आला. यामध्ये गोंधळे- बौद्धवाडी, मांजरेकौंढर-बौद्धवाडी, कौंढरताम्हाणे-बौद्धवाडी, तसेच रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर, सरचिटणीस सतीश जाधव, कार्यकारिणी सदस्य शेखर कदम, युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रथमेश भोबस्कर, उमरोली सरपंच महेंद्र मांडवकर, रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी शिर्के, गणपत म्हादे, राकेश डांगले, संजय जाधव, राजेश जाधव उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.