हातखंबा : रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा येथील होळीकुंठ येथील गणेश घाटावर अनेक घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येते. विसर्जनावेळी शेवाळीवरून घसरून पडण्याची भीती अधिक असते. त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता असते. अशा दुर्घटना घडू नयेत, यासाठी लायन्स क्लब ऑफ हातखंबा राॅयलतर्फे या गणेश विसर्जन घाटाची स्वच्छता करण्यात आली.
पावसाळा असल्याने बहुतांश गणेश विसर्जन ठिकाणी गवत, नदीजवळ शेवाळ धरलेले असते. अशातच विसर्जनावेळी पाय सरकण्याची शक्यता जास्त असते. विसर्जनासाठी येणाऱ्या लोकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि लोकांना होणारा त्रास रोखण्यासाठी लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयलतर्फे गणेश घाटाजवळ सफाई अभियान हाती घेण्यात आले होते. यावेळी विसर्जना ठिकाणी लोक जिथे पूजा-अर्चा करतात, त्या जागेची साफसफाई करण्याचे काम क्लबतर्फे करण्यात आले. या स्वच्छता अभियानामध्ये क्लबचे अध्यक्ष मनोजकुमार खानविलकर, सहखजिनदार अंकिता देसाई, सचिन सावेकर, उमेश कुलकर्णी, वरद खानविलकर सहभागी झाले होते.