दापोली : येथील राजे स्पोर्टस् ॲकॅडमीकडून तालुक्यातील आगरवायंगणी येथील गणेश विसर्जन घाटाची सफाई करण्यात आली. पाच दिवसांच्या गणेश व गौरी विसर्जनानंतर या घाटावर नदीतून मोठ्या प्रमाणावर निर्माल्य वाहून आले होते. राजे स्पोर्टस ॲकॅडमीतर्फे नदीची व या घाटाची साफसफाई करण्यात आली.
रिक्त पदे भरण्याची मागणी
रत्नागिरी : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हिरवा चारा उपलब्ध असूनही पाळीव जनावरांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. ही संख्या वाढण्यासाठी जिल्ह्यातील पशूसंवर्धन विभागातील रिक्त पदे भरण्याची गरज आहे. त्यामुळे ही पदे तत्काळ भरण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
नेटवर्कची अडचण
गुहागर : कोरोनाचा संसर्ग अजूनही म्हणावा तसा कमी झालेला नाही. त्यामुळे शासनाने शाळा आणि महाविद्यालये पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी परवानगी दिलेली नाही. सध्या ऑनलाइन शिक्षण अजूनही सुरू आहे. मात्र ग्रामीण भागामध्ये नेटवर्कची मोठ्या प्रमाणावर समस्या असल्याने शैक्षणिक कामकाजात तसेच अन्य व्यवहारातही अडचणी निर्माण होत आहेत.
वर्षावास कार्यक्रम
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथील अखिल माखजन बौद्धजन भावकी मुंबई आणि ग्रामस्थ तसेच बुद्धविहार ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. धम्म प्रचारक म्हणून बौद्ध उपासक संदीप कदम तसेच सोळा गाव विभागाचे अध्यक्ष संतोष पवार, बबन पवार, रामचंद्र कदम आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना साहित्य
गुहागर : तालुक्यातील धोपावे येथील ग्रामविकास मंडळ, मुंबई आणि स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागरचे अध्यक्ष साहिल आरेकर यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. अनिल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी धोपावेतील २२ विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले.