देवरुख : श्रमदान स्वच्छता मोहिमेद्वारे दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी निगुडवाडीतील महिपत गडावर स्वच्छता मोहीम राबविली. यावेळी गडावरील टाक्यांमध्ये असलेला गाळ काढून संपूर्ण परिसरातील स्वच्छता करण्यात आली. दोन गटांनी ही मोहीम पार पाडली.
डांबरीकरण पूर्ण
सावर्डे : चिपळूण तालुक्यातील खरवते प्राथमिक आरोग्य केंद्र ते गांधी दुकानापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाल्याने वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे. यापुढील रस्त्याचेही डांबरीकरण लवकरच करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
धुळीचा नागरिकांना त्रास
चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम शहर परिसरात पुन्हा वेगाने सुरू झाले आहे. सध्या उन्हाळ्याचा त्रास होत असून, वाऱ्याचाही त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे धुळीचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे. या धुळीने नागरिकांना हैराण केले आहे.
खवटीत धावला टँकर
आवाशी : खेड तालुक्यातील दुर्गम भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य दिवसेंदिवस वाढू लागले आहे. नैसर्गिक जलस्रोत आटू लागल्याने ग्रामीण भागातील लोकांचे हाल होऊ लागले आहेत. ग्रामीण भागातील धनगर वाड्यांमध्ये पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले असून खवटी धनगरवाडी येथे पहिले टँकर सुरू झाले आहे.
सोसायटीची वार्षिक सभा
रामपूर : येथील मिलिंद हायस्कूलमध्ये एज्युकेशन सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन कामगार नेते शंकर साळवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कोरोनाच्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व नियमांचे पालन करून झालेल्या या सभेत विविध विषयांवर चर्चा झाली.
शिवजयंती उत्सव
आवाशी : खेड तालुक्यातील मांडवे, कोसमवाडी येथे तरुण मित्रमंडळ, मुंबई आणि नवीन हंगामी कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. खेड तालुक्यातील रसाळगड येथून पहाटे शिवज्योत आणण्यात आली. मर्यादित संख्येत मिरवणूक काढण्यात आली.
भाज्यांचे दर घसरले
रत्नागिरी : सध्या भाज्यांचे दर कमी झाल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे. याआधी १०० ते १२० रुपये किलो दराने बहुतांश भाज्या खरेदी कराव्या लागत होत्या. टोमॅटोचे दरही ८० ते १०० रुपये किलोपर्यंत पोहोचले होते. मात्र, आता सर्वच भाज्यांचे दर खाली आले आहेत.
पिकावर किडीचा प्रादुर्भाव
दापोली : कोकण विभागातील बहुतांश ठिकाणी काही दिवसांपूर्वी तुरळक पाऊस झाला, तसेच पुढील काही दिवस वातावरण ढगाळ राहणार आहे. त्यामुळे आंबा पिकावर कीड व रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांमधून पुन्हा चिंता व्यक्त होत आहे.
सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान
दापोली : येथील जेसीआयतर्फे नगरपंचायतमधून कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कोरोना काळात या कोविड योद्ध्यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावून शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचा सन्मान जेसीआयतर्फे करण्यात आला.
कोरोनाने वाढविली चिंता
गुहागर : गुहागर तालुक्यातही आता कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे आता तालुक्यातील आरोग्य यंत्रणेवर अधिक ताण येत आहे. शिमगोत्सवात कोरोना रुग्णांची संख्या वाढणार हा धोका व्यक्त होत असतानाच संख्या वाढू लागल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त होऊ लागली आहे.