चिपळूण : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या विरेश्वर तलावात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या बाटल्या व अन्य कचरा साचला आहे. हा कचरा काढण्यासाठी मोहीम राबवली जात आहे.
मंगळवारी लोकसहभागातून या कामाला सुरुवात झाली. पुढील तीन दिवस रोज सकाळी ७ ते ८ यावेळेत एक तास साफसफाई केली जाणार आहे. विरेश्वर तलाव हा चिपळूण शहरातील ऐतिहासिक तलाव असून, या तलावात मासे आणि कासवे आहेत. अनेक नागरिक याठिकाणी माशांना बिस्कीट, चपाती आणि पाव खाण्यासाठी टाकतात. मात्र, काही मद्यप्रेमी इथे दारू पिऊन बाटल्या तलावात टाकतात. त्यामुळे आता लोकसहभागातून येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या परिसरात कोणीही रिकाम्या बाटल्या, प्लास्टिक आणि कचरा टाकू नये, असे आवाहन स्थानिक नागरिकांनी केले आहे.