खेड : तालुक्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ३४५ झाली असून, एप्रिलच्या २० दिवसांत एकूण ४७४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण पुन्हा वाढू लागले आहे. सद्य:स्थितीत तालुक्यातील ३६ ठिकाणी कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत. या वर्षी जानेवारी महिन्यात एकूण ३५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते; तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला. फेब्रुवारी महिन्यात १०४ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले, तर तीन रुग्ण मृत्युमुखी पडले. आता २० एप्रिलपर्यंत एकूण रुग्णसंख्या ४७४ झाली आहे; तर १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या वर्षभरात तालुक्यात एकूण २१९९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून यांपैकी १७६४ जणांनी कोरोनावर मात केली आहे; तर ९२ जणांना प्राण गमवावा लागला आहे.
तालुक्यातील आठ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आंबवली आरोग्य केंद्रात सर्वांत जास्त ४५६ कोरोना रुग्ण आले आहेत. त्यापाठोपाठ खेड नगर परिषद कोविड सेंटरमध्ये ४४३, तर लोटे आरोग्य केंद्रांतर्गत ४३७ रुग्ण आढळून आले आहेत.
सद्य:स्थितीत ३४५ रुग्ण उपचार घेत असून, यामध्ये खेड शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये १६, कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात ४७, होम आयसोलेशनमध्ये १६५, तर लवेल येथील कोविड सेंटरमध्ये ९४ रुग्ण उपचार घेत आहेत.
तालुक्यातील वरवली येथे फेब्रुवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. या संसर्गाचे कारण तेथील एक सार्वजनिक उत्सव ठरला होता. मार्च महिन्यात पुन्हा एकदा असाच प्रकार कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या तळघर येथे घडला होता. तालुक्यातील लसीकरण मोहीम सुरू असली तरी पुरेसा लस साठा उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना लसीकरण केंद्रातून परत फिरावे लागते.