असुर्डे : तौक्ते वादळामुळे सतत पाच दिवस पाऊस पडला. भर मे महिन्यात घामाच्या धारा वाहण्याऐवजी पावसाच्या धारांनी अनेक नद्यांना साखळी फुटली. त्यामुळे कोकरे - असुर्डे गावांच्या परिसरातील लोकांनी चढणीच्या माशांची लयलूट केली. प्रामुख्याने यामध्ये मळ्याचा मासा माेठ्या प्रमाणात पकडला गेला.
हे मासे अंडी सोडण्याकरिता सैरावैरा पळत सुटतात. हे सर्व मासे गडनदीतून छोट्या - मोठ्या नद्या, परे, ओहळ, मोठमोठी शेते यामध्ये पळत सुटतात. सहजतेने बांधन, टोके, पाळणे, विंद, पाग यांच्या साहाय्याने मासे पकडले जातात. मुरडव, येगाव अशा गावांमध्ये तर गोणीभर मासे पकडले जातात. काही ठिकाणी त्यांचा विक्री दर २०० ते ३०० रुपयांपर्यंत आहे. ताजे मासे असल्यामुळे त्याला मोठी मागणी आहे. गेल्या पन्नास वर्षात तर असे कधीही घडले नाही, असे येथील जाणकारांनी सांगितले.