आॅनलाईन लोकमत
देवरूख : देवरूख ग्रामीण रूग्णालयातील एक्स- रे विभाग गेली अनेक महिने बंद असल्याने सर्वसामान्यांना एक्स- रे काढण्यासाठी खासगी रूग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. एक्स- रे विभाग लवकरात लवकर रूग्ण सेवेसाठी खुला करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना देवरूख विभागप्रमुख प्रथमेश कुलकर्णी यांंनी केली आहे. अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल असा सज्जड इशाराही कुलकर्णी यांनी दिला आहे.
देवरूख या मध्यवर्ती ठीकाणी देवरूख ग्रामीण रूग्णालय उभारण्यात आले आहे. अल्प दरात सेवा मिळत असल्याने उपचार करून घेण्यासाठी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातील जनता याठीकाणी येते. शेकडो गोरगरिब दररोज या ठीकाणी हजेरी लावतात. रूग्णालयात वेगवेगळे विभाग कार्यन्वीत आहेत. यातील एक्स- रे विभाग हा गेली सहा महिन्यांपासून बंद असल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत.
एक्स- रे काढण्यासाठी ग्रामीण रूग्णालयाच्या तुलनेपेक्षा खासगी डॉक्टर चारपट अधिक घेतात.यामुळे गोरगरिब जनतेला नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. एक्स- रे विभागात कर्मचारी तैनात केल्यास गोरगरिबांना आर्थिक फटका बसणार नाही. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. लवकरात लवकर एक्स-रे विभाग रूग्णांच्या सेवेत दाखल होणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा सेना स्टाईलने आंदोलन छेडण्याचा स्पष्ट इशारा कुलकर्णी यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)