लांजा : शहरात रविवारी ढगफुटीसदृश पाऊस पडल्याने शहरातील अनेक ठिकाणी पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांची धावपळ उडाली होती. सायंकाळी ५.३० नंतर पावसाचा जोर कमी झाल्याने उद्भवलेली गंभी परिस्थिती कमी झाली. मात्र, ग्रामीण भागामध्ये पावसाचा जोर कमी होता.रविवारी दिवसभर आकाशात काळेकुट्ट ढग जमा झालेले होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमाराला पावसाला सुरूवात झाली. तब्बल चार तास पाऊस कोसळत होता. मुसळधार पावसामुळे शहरातील फुगीचा पऱ्याला पूर आला होता. पऱ्यातील पुराचे पाणी व्दारका रेसिडेन्सी इमारतीच्या परिसरात घुसल्याने या इमारतीमधील नागरिक भयभीत झाले होते.
पुराचे पाणी गुडघाभर असल्याने येथील रहिवाशांनी घरामध्येच बसून राहाणे पसंत केले होते. याच पऱ्याचे पाणी महिलाश्रम परिसर येथील रस्त्यावरुन वाहून सरळ राणे इंग्लिश मीडियम स्कूल येथील रस्त्यावर आले होते.ओझर पऱ्याचेही पाणी वाढले होते. या पऱ्याच्या पुराचे पाणी कॉसमॉस सदनिका वसाहतीत घुसले होते. शहरातील नाईकवाडी येथील इसाक नाईक, मुझफ्फर नाईक, फातिमा नाईक, मुन्ना नाईक, सिराज नाईक यांच्या घरामध्येही पाणी घुसले होते. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. अनेकजण घरात बसूनच होते.भातशेती आडवीपावसाने उघडीप घेतल्यानंतर शेतकरी राजा सुखावला होता. मात्र, शनिवार सायंकाळपासून रविवारी दिवसभर पडत असलेल्या पावसाने भातशेती आडवी झाली आहे. रिपरिप कोसळणाऱ्या पावसाने उघडीप घेतल्यानंतर कडकडीत ऊन पडले होते. शुक्रवारी कापणी केलेली भातशेती शनिवारी दुपारपर्यंत न सुकवताच गोळा करुन घरी आणली होती. रात्री पावसाचा जोर वाढला तो रविवारीही कायम होता. त्यामुळे कापलेले पीक पावसामध्ये भिजून गेले.