मंडणगड : पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मंडणगड शहरास संपुर्ण तालुक्यात शनिवारी कडकडीत बंद पाळण्यात आला.शुक्रवारी रात्री शहरातील सर्वपक्षीय नागरीकांनी शहरातील मुख्य नाक्यात एकत्र येऊन दहशतवादाचा प्रतित्मकात्मक पुतळा जाळला.
यावेळी अमर रहे अमर रहे वीर शहीद जवान अमर रहे, भारत माता की जय, चोर है चोर है, पाकिस्तान चोर है, अशा घोषणा देत शुक्रवारी निषेधसाठी शहरातील मुख्य बाजारपेठ बंद ठेवण्याची हाक दिली. शहर व्यापारी संघटना तालुक्यातील सर्वपक्षीय बंदच्या हाकेला साद देत बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवली.
या निमित्ताने नगरपंचायत व्यापारी संकुलासमोर श्रध्दांजली सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस शहरातील सर्व प्रतिष्ठीत राजकीय पक्षांचे प्रतिनिधी मान्यवरांसह शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभेच्या सुरुवातीस वीर जवान शहीदांना श्रद्दांजली वाहण्यात आली. यावेळी महिला विद्यार्थी व मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना दहशतवाद व त्याचे समर्थन करणाऱ्या पाकिस्तानचा सर्वांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
सभेचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. यानंतर दहशतवादाचा प्रतिकात्मक पुतळाही जाळण्यात आला. सभेच्या आधी व नंतर विद्यार्थी व नागरीकांना शहरातून रॅली काढली. यानंतर राजे प्रतिष्ठानच्यावतीने मंडणगड शहर ते कुंबळे बाईक रॅली काढण्यात आली.