लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : उद्योगमंत्री उदय सामंत यांचे खंदे समर्थक आणि रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष राहुल पंडित यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दक्षिण रत्नागिरीच्या जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. काही दिवसांपूर्वीच ते शिंदे गटात सामील झाले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत मुंबईत ही नेमणूक जाहीर केली असून, राहुल पंडित यांचे मुख्यमंत्र्यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदनही केले आहे.
राहुल पंडित हे रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष असून, खासदार विनायक राऊत यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून ओळखले जात होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारीही टाकण्यात आली होती. शिवाय काही महिन्यांपूर्वी त्यांची शिवसेनेने जिल्हा समन्वयक म्हणून नेमणूक केली होती.
मात्र, गेले काही महिने खासदार विनायक राऊत यांनी त्यांना दूर केले होते. पक्षाच्या कार्यक्रमापासूनही त्यांना लांब ठेवण्यात आले होते. मंत्री सामंत शिंदे गटात सामील झाल्यानंतर त्यांच्या दौऱ्यात राहुल पंडित यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर शिवसेनेने त्यांची जिल्हा समन्वयक पदावरून हटविले होते.
पक्षाच्या या कारवाईनंतर राहुल पंडित शिंदे गटात सामील झाले. राजकारणातील त्यांचा अनुभव पाहता शिंदे गटात सामील होताच त्यांच्यावर दक्षिण रत्नागिरीच्या जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.