खेड : कोकणात निसर्ग व तौक्ते चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याचे दिलेले वचन त्यांनी पूर्ण करावे, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
खेड तालुक्यातील बोरज घोसाळकरवाडी येथील प्रकाश व वंदना घोसाळकर या दाम्पत्याचा तौक्ते चक्रीवादळदरम्यान ३३ हजार व्होल्टेजची विजेची तार अंगावर पडून मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर कोकण दौऱ्यावर असलेले केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी (दि २० रोजी) प्रकाश व वंदना घोसाळकर यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी भेट घेतली. यावेळी ते म्हणाले की, सरकारने घोसाळकर कुटुंबाला चार लाख मदत देऊ केली आहे. ही मदत कमी असून, किमान दहा लाख रुपयांची मदत देण्याची मागणी मी राज्य सरकारकडे करतो. कोकणात मोठ्या प्रमाणात निसर्ग व तौक्ते या दोन वादळात शेती, आंबा व नारळ बागायती यांचे नुकसान झाले आहे. कोकणी माणसाचे झालेलं हे नुकसान भरून निघणे कठीण आहे़. राज्य सरकारने येथील जनतेला साथ देणे गरजेचे आहे. स्थानिक प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे काम सुरू असून, या वादळात नुकसानीचा आढावा घेऊन मी स्वतः केंद्र सरकारकडूनही मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे त्यांनी सांगितले़.
कोकणात निसर्ग वादळात ज्यांचे नुकसान झाले, त्यांच्यापैकी काहींना अद्याप मदत मिळालेली नाही, असे समजत आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी यापूर्वीच शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याचे वचन दिले आहे. या परिस्थितीत त्यांनी ते पूर्ण करावे, असे आठवले म्हणाले.
यावेळी त्यांच्यासोबत प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने, तहसीलदार प्राजक्ता घोरपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकिरण काशीद, निरीक्षक नीशा जाधव, आरपीआयचे कोकण प्रभारी सुशांत सकपाळ, आदेश मर्चंडे, सुरेंद्र तांबे, बोरज प्रभारी सरपंच विशाल घोसाळकर यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.