रत्नागिरी : भारतीय तटरक्षक दलाच्या रत्नागिरी कार्यालयातर्फे मंगळवार, दि. ६ रोजी केंद्र शासनाच्या पुनीत सागर अभियानांतर्गत वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय कॅडेट कोर (एनसीसी) च्या कॅडेट्सनी देखील यात सहभाग घेतला.भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीचे कमांडिंग ऑफिसर उपमहानिरीक्षक शत्रूजित सिंग यांनी सकाळी साडे सात वाजता ध्वज दाखविल्यानंतर मिरजोळे एमआयडीसी येथील एच-२ प्लॉट स्थित तटरक्षक दलाच्या कार्यालयापासून हा वॉकथॉन करण्यात आला. भारतीय तटरक्षक दलाचे अधिकारी व कर्मचारी तसेच गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे एनसीसी कॅडेट्स अशा एकूण तीस जणांनी हा सुमारे १५ किलोमीटर अंतराचा वॉकथॉन पूर्ण केला.स्वातंत्राच्या अमृतमहोत्सवी वर्षी १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सागर किनारा स्वच्छता दिनानिमित्त नागरिकांमध्ये सागर व किनारा स्वच्छता तसेच सागरी परिसंस्थेचे जतन करणे यांबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि या दिनी अधिकाधिक लोकांना किनारा स्वच्छतेसाठी सहभागी घेण्यास प्रेरित करणे, या उद्देशाने केंद्र शासनाने यावर्षी पुनीत सागर अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गतच या वाॅकथॉनचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी तटरक्षक जवान आणि एनसीसी कॅडेट्सनी सागरी सुरक्षा आणि स्वच्छ सागर किनाऱ्याचे महत्व दर्शविणारे फलक हाती घेतले होते. यावेळी विद्यार्थ्यांना योगाद्वारे जीवन निरोगी राखण्यासाठी मार्गदर्शन देखील करण्यात आले.
तटरक्षक दलाचे जागृतीसाठी १५ किलोमीटर वॉकथॉन, किनारा स्वच्छता उपक्रमासाठी नागरिकांना आवाहन
By शोभना कांबळे | Published: September 06, 2022 7:05 PM